सावंतवाडी न.प.च्या सुधारीत नळपाणी योजनेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन सोहळा 

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत करणे या कामाचा भूमीपूजन सोहळा शनिवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे असणार आहेत.

तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खा. विनायक राऊत, आ. नितेश राणे, आ. वैभव नाईक, आ.निरंजन डावखरे, आ. अनिकेत तटकरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिमखाना मैदान सावंतवाडी येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या योजनेसाठी महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. नगरो-२०२३/प्र.क्र./१९१/नवि-३३ दि २५/०४/२०२३ द्वारे ५६.१७ कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत पाळणेकोंड धरणाची सुधारणा करणे, नवीन जलशुध्दीकरण केंद्र बांधणे, शहरातील झिरंग व गरड भागामध्ये दोन उंच सलोह पाण्याच्या टाक्यांची उभारणी करणे, पाळणेकोंड धरण ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत गुरुत्ववाहिनी टाकणे तसेच शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारणे इ. कामे करण्यात येणार आहेत.

तरी सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठ्या संबंधी ही एक महत्वाची योजना असून सदर योजनेच्या भूमीपूजन सोहळयात नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यानी केले आहे.