नेते रामदास कदम यांचा अवमान: सोशल मीडियावर व्हिडिओ
खेड(प्रतिनिधी)शिवसेना नेते रामदास कदम यांचा अपमान करणाऱ्या घोषणा व शिव्या देत सार्वजनिक ठिकाणी वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख यांनी बुधवारी दि.७ रोजी पोलीस व प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खेड शिवसेनेच्या वतीने बुधवारी खेड पोलीस ठाणे व तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी त्यांनी तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी सांगितले, खेड रेल्वे स्टेशन येथे माजी पर्यावरण मंत्री तथा
शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांच्याविरुद्ध करण्यात आलेला घोषणाबाजीत त्यांना केलेली शिवीगाळीबाबत उच्चस्तरीय चौकशी करणे व संबंधित सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक होते. मात्र ०५ रोजी खेड रेल्वे स्टेशन येथे सायंकाळी ७.०० चे सुमारास खेड-दापोली-मंडणगडचे माजी आमदार संजय कदम व त्यांचे कार्यकर्ते हे देखील जमाव करून गेले होते. उद्धव ठाकरे हे खेड रेल्वे स्टेशन येथे आले असता, त्या जमावाने महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांचेविरुद्ध अतिशय अपमानकारक शिवीगाळ करून घोषणाबाजी केली. तसेच दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक वक्तव्य केली. ही बाब गंभीर आणि निंदनीय आहे. या घटने नंतर खेड पोलीस स्टेशन येथे मी तक्रार दिली असता. केवळ रत्नागिरी जिल्हा युवासेना प्रमुख अजिंक्य मोरे यांच्याविरुद्ध खेड अदखलपात्र पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
खेड रेल्वे स्थानकात येथे झालेल्या प्रक्षोभक घोषणाबाजीचे व्हिडिओ व फोटो सर्वत्र प्रसारित झाले आहेत. त्यामध्ये संजय कदम यांच्यासह अन्य कार्यकर्ते देखील घोषणाबाजी करताना दिसता आहेत, त्यांचेविरुद्ध अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई पोलीस व प्रशासनाने केलेली नाही. पुढील सात दिवसाच्या आत सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओ व फोटोच्या आधारे संबंधित सर्व व्यक्तींच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल व त्यामध्ये होणाऱ्या नुकसानकारक परिणामास पोलीस व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी यावेळी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते, महिला शहर संघटक सौ. माधवी बुटाला, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश खेडेकर, युवती सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी निवेदनाची प्रत
पोलिस अधिक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड, उपविभागीय अधिकारी
खेड डॉ.जस्मिन, तहसिलदार खेड यांना देण्यात आली आहे











