मालवण ‘भक्तीसागरात’ चिंब!

महोदय पर्वणी निमित्ताने देवतांसह हजारो भाविकांचे तीर्थस्नान : भाजप नेते निलेश राणे सोहळ्यात सहभागी होत देवता चरणी नतमस्तक

अमित खोत | मालवण : पालखी-तरंग व लवाजम्यासह भाविकांच्या उपस्थितीत मालवण कुडाळ तालुक्यातील देवतांचा महोदय पर्वणी (समुद्री स्नान) सोहळा शुक्रावारी मोठ्या भक्तिमय वातावरणात मालवण दांडी वायरी येथील मोरेश्वर तीर्थक्षेत्री उत्साहात संपन्न झाला. ढोलताशांचा गजर, सनाईच्या सुराने परिसर गजबजून गेला. देवतांनी स्नान केल्यानंतर भाविकांनीही समुद्र स्नान केले. भक्तिभावाचा हा संगम अनुपम्य असा ‘कुंभमेळा’ ठरला.

मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण यासह मालवणात दाखल झालेल्या अनेक देवतांच्या व भाविकांच्या उपस्थितीने मालवण किनारी जनसागर उसळला. कांदळगाव श्री देव रामेश्वर व रेवंडी श्री देवी भद्रकाली यांनी कोळंब सोमवती तीर्थक्षेत्र व सर्जेकोट समुद्रकिनारी महोदय पर्वणीस उतरल्याने याठिकाणीही भक्तीसागर दिसून आला.

भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी मोरेश्वर देवस्थान या ठिकाणी महोदय पर्वणी सोहळ्यात उपस्थित राहून देवता चरणी नतमस्तक झाले. यावेळी भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, बाबा परब, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, दामोदर तोडणकर, कुडाळ नगरसेवक अभी गावडे, आबा हडकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, प्रमोद करलकर, जयेंद्र परब, भाई मांजरेकर, माजी सरपंच भाई ढोके, मंदार लुडबे, राजू बिडये, ललित चव्हाण, अभय कदम, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, तात्या हिंदळेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. निरूखे कुडाळ येथील श्री देव रवळनाथ पंचायतन वायरी भूतनाथ येथील भाई मांजरेकर यांच्या निवासस्थानी थांबले होते. याठिकाणीही निलेश राणे देव आरतीत सहभागी झाले.

सकाळी ८ वाजल्या पासून भविकाची उपस्थिती समुद्र किनारी वाढत होती. या अमृत सोहळ्यानिमित्त श्री मोरेश्वर तीर्थक्षेत्रावर समुद्र स्नानासाठी हजारो भाविक-भक्ताचा जनसमुदाय लोटला. मालवणात महोदय पर्वणीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

मालवण दांडी मोरेश्वर तीर्थक्षेत्री महोदय पर्वणी निमित्त मालवणची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर-नारायण, तिरवडेची श्री माउली देवी, पडवे श्री रामेश्वर, पडवे श्री रवळनाथ, निरुखेचा रवळनाथ, अणाव स्वयंभू श्री रामेश्वर, ओरोस श्री रवळनाथ, नांदोस गिरोबा, कसाल पावणाई- रवळनाथ, साळेलचा देव गिरोबा, सोनवडे येथील श्री लिंगेश्वर यांसह कुडाळ मालवण तालुक्यातून आलेल्या विविध देवतानी समुद्र किनारी पूजा स्नान केले. यासह अन्य गावातील गावरहाट्या व देव-देवतानी या महोदय पर्वणी निमित्त मंगलमयी स्नानाचा लाभ घेतला.

महोदय पर्वणी योग आल्याने मालवणात भक्तिमय वातावरण दिसून आले. मालवणात मोहदय पर्वणी योग निमित्त येणाऱ्या देवताच्या स्वागतासाठी मालवण नगरी सज्ज झाली होती. गुरुवारी रात्री ठीक-ठिकाणची ग्रामदेवता आपल्या रयतेसह मालवण शहरात दाखल झाले. रात्री देव जागरण, भजन, नामस्मरण आदि कार्यक्रम झाले. काही देवता सकाळी समुद्र स्नाना साठी मालवणात दाखल झाले. मालवण येथील नागरिकांनी सड़ा-रांगोळी घालून, गुढ्या-तोरणे उभारून ठीक-ठिकाणी देवताचे स्वागत केले.

भाजप नेते निलेश राणे, उद्योजक दत्ता सामंत यांच्या संयुक्त विद्यमामे मोरेश्वर मित्रमंडळ, अशोक तोडणकर मित्रमंडळ यांच्या वतीने भाविकांना मोफत अलपोपहर व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी याचा लाभ घेत समाधान व्यक्त केले.

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात मच्छिमार बोटी व समुद्री सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गावर पोलिस बंदोबस्त होता. मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात महोदय पर्वणी समुद्र स्नानाचा सोहळा संपन्न झाला.