वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत सर्व सण- उत्सव हे पर्यावरण पूरक साहित्याचा वापर करून प्रदूषण मुक्त कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. याच संकल्पनेस अनुसरून पर्यावरण पूरक शून्य कचरा कार्यक्रमाबाबत नागरिकांमधे जागरूकता निर्माण करण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत घोडेबावं गार्डन येथे “शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ” साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये शहरातील ५०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या महिलांना वाण म्हणून झाडाचे एक रोपटे भेट देण्यात आले. या ठिकाणी हळदी कुंकू, फुले, तिळगुळ, लाडू इ साहित्य ठेवण्यासाठी मातीची भांडी वापरण्यात आली. या ठिकाणी नैसर्गिक रंग व विड्याचे पान वापरून रांगोळी काढण्यात आली. तसेच कार्यक्रमासाठी कापडी बॅनर वापरण्यात आले. अशापद्धतीने या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारे प्लॅस्टिकचा वापर न करता पारंपरिक वस्तूचा वापर करून पर्यावरण पूरक असा “शून्य कचरा- हळदी कुंकू समारंभ” वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत साजरा करण्यात आला.











