शोषखड्डा अभियानात कुडाळ पंचायत समिती राज्यात सर्वोत्कृष्ट

Google search engine
Google search engine

 

शिरपेचात मानाचा तुरा : शुक्रवारी राज्यपालांच्या उपस्थितीत गौरविणार

कुडाळ प्रतिनिधी

 

संपूर्ण महाराष्ट्रात शोषखड्डा मोहीमेमध्ये एकमेव कुडाळ पंचायत समितीची सर्वोकृष्ट निवड झाली आहे.  पंचायत समितीने  पुन्हा एकदा यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये २३२९१ शोषखडयामध्ये एका कुडाळ तालुक्यात ९३१७ असे सर्वाधिक शोषखड्डे मारण्यात आले. या पुरस्काराचे वितरण शुक्रवार ३ मार्चला मुंबई येथे होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करुन सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणे आणि सर्वांगीण ग्रामसमृध्दी योजनेचा  शुभारंभ ३ मार्च सकाळी११.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी  महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मा. विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानमंडळ,  मुख्यमंत्री,  उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्री, ३४ जिल्ह्यामधील उत्कृष्ट काम करणारे १२० गट विकास अधिकारी हे हजर राहणार आहे.

गेल्या तीन वर्षात २०२०- २०२१, २०२१-२०२२ ,२०२२-२०२३ या वर्षात  ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम केलेल्या अधिकाधिक  संस्थांना सर्वोच्च ग्रामपंचायतना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

कोविड कालावधी असतानासुद्धा  ग्रामपंचायत तालुका व जिल्हास्तरावर वैशिष्ट्यपूर्ण काम करताना कुडाळ तालुका पंचायत समितीने गेली तीन वर्षे ‘माझं घर माझा शोषखड्डा’ हे अभियान राबविले होते. जिल्हा परिषद तत्कालिन अध्यक्षा संजना सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित  नायर यांच्या  प्रमुख उपस्थितीत  या योजनेचा जिल्हा पातळीवरील शुभारंभ पणदूर येथे तर समारोप नेरूर या ठिकाणी  करण्यात आला होता.

या वैशिष्ट्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाची राज्य शासनाने दखल घेतली असून कुडाळ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी  विजय चव्हाण व सहायक प्रशासन अधिकारी चंद्रशेखर माळकर यांना निमंत्रित केले आहे. त्यांचा  गौरव होणार आहे.

 

चौकट

सलग तीन वर्षे राज्यात अव्वल

 

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या कोकण विभागात कुडाळ पंचायत समितीने बाजी मारली आहे. यापूर्वी कुडाळ तालुक्याने सलग तीन वर्षे राज्यात अव्वल आहे. तसेच महाआवास योजनेत अव्वल स्थान प्राप्त केले होते. यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी शेखर माळकर, अधीक्षक नंदकुमार धामापुरकर, शिल्पा वेंगुर्लेकर, अमित देसाई, मंदार पाटील, विजया जाधव, रुपेश चव्हाण  तालुक्यातील सर्व ग्रामसेवक सर्व सरपंच ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.