‘आदर्श कार्यक्रमाधिकारी’ पुरस्काराने निनाद तेंडुलकर यांचा सन्मान

रत्नागिरी : शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक (पुणे) यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या रा. से. यो. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद नारायण तेंडुलकर यांना प्राप्त झाला.

शिक्षण संचालनालय पुणे व अमरावती विभागाच्या वतीने विवेकानंद आश्रम (हिवरा बु. ता. मेहकर जि. बुलढाणाः येथे रा. से. यो. विभागाचे राज्यस्तरीय शिबीरात सहायक संचालक सिध्देश्‍वर काळुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील पाच स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर सहभागी झाले.

प्रा. तेंडुलकर हे ९ वर्षे अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या रा. से. यो. विभागात कार्यक्रमाधिकारी आहेत. त्यांनी सहकार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक याच्या सहकार्याने अनेक समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेतला. निवासी शिबीरे, रक्तदान शिबीरे, सहशालेय उपक्रम, वनराई बंधारे बांधणे, जनजागृती पथनाटय सादरीकरण, विविध रॅली व प्रभात फेरी, शासकीय उपक्रमात स्वयंसेवकांसह सक्रीय सहभागाबद्दल कोल्हापूर विभागाचा आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्कार मिळाला आहे.

कार्यक्रमावेळी प्रा. तेंडुलकर मनोगतात म्हणाले की, हा पुरस्कार सर्व माजी कार्यक्रमाधिकारी यामध्ये प्रा. सुशील वाघधरे, प्रा. माणिक बाबर, प्रा. दत्तात्रय वालावलकर, प्रा. हिराजी शेजवळ, प्रा. बळवंत दीपंकर, प्रा. मकरंद दामले, प्रा. प्रभात कोकजे व सर्व सहकार्यक्रमाधिकारी व रा. से. यो. स्वयंसेवक या सर्वांच्यावतीने स्वीकारला. तसेच या पुरस्कारासाठी कोल्हापूर शिक्षण उपसंचालक महेश चोथे, सहायक शिक्षण संचालक स्मिता गौड, कोल्हापूर विभागीय समन्वयक प्रा. राजेंद्र कोळेकर, जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. सुनिल गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर व सर्व माजी कार्यक्रमाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतिश शेवडे, सहसचिव श्रीकांत दुदगीकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद देसाई यांनी कौतुक केले.