कोकणकन्या एक्सप्रेसमधून रेटारेटीचा प्रवास!

खेड(प्रतिनिधी) कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्या विक्रमी गर्दीने धावत आहेत. ;विकेंड मुळे रेल्वेगाड्यांना तोबा गर्दी उसळत असून प्रवाशांना रेटारेटीचा प्रवास करत इच्छितस्थळ गाठावे लागत आहे. शनिवारी  सीएसएमटी मुंबई – मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसला उसळलेल्या विक्रमी गर्दीतून प्रवाशांना लोंबकळतच प्रवास करावा लागला. एकीकडे रेटारेटीचा प्रवास, दुसरीकडे विलंबाच्या प्रवासाचा मनस्तापही कायम आहे.
कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह एक्सप्रेस गाड्यांना होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा सुरू आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होत असली तरी विक्रमी गर्दीने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांना रेटारेटीचा अनू लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. लग्नसराईसह जत्रोत्सवाचा हंगाम सुरू झाल्याने चाकरमानी गावाकडे डेरेदाखल होत आहेत. यामुळे रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत.
कोकण मार्गावरील आडवली- आर्चिणे विभागादरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे शुक्रवारीही रेल्वेगाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक शनिवारी पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ११०९९ क्रमांकाची एलटीटी- मडगाव १ तास २० मिनिटे तर १६३३८ क्रमांकाची ओखा एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे विलंबाने धावली. या दोन गाड्यांचा अपवाद वगळता सर्वच रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. २०१११ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस शनिवारी विक्रमी गर्दीने धावली. या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नव्हती. मात्र तरीदेखील प्रवाशांनी लोंबकळत प्रवास करत गाव गाठले. तुतारी एक्सप्रेसही हाऊसफुल्ल धावली. परतीच्या प्रवासातही गर्दीचा उच्चांक कायम होता. यामुळे त्या-त्या रेल्वेस्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश मिळवताना प्रवाशांची दमछाक होत आहे.