कोंडये मधलीवाडी येथे १३ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

नाम. रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील गणेश सेवा मंडळ (मुंबई) व ग्रामस्थ मधलीवाडी कोंडये यांच्या वतीने कोंडये येथील श्री गणेश मंदिरात सोमवार १२ फेब्रुवारी व मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून मधलीवाडी प्रवेशद्वार ते सतीचा माळ रस्त्याचे उद्घाटन सार्व. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे उपस्थीत राहणार आहेत.

या माघी गणेश जयंती उत्सवा निमित्त सोमवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी. १० वा. ग्रामदेवतेला श्रीफळ अर्पन, दुपारी. २ वा. पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्रौ १० वाजता श्री चंडीकादेवी ग्रामस्थ मंडळाचे पालखी नृत्य सादर होणार आहे. मंगळवार दि. १३ रोजी सकाळी ८ वाजता श्रींची अभिषेक पूजा, सकाळी ९ वा. सत्यनारायण पुजा, दुपारी १२ वाजता महाआरती, सायंकाळी ४ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ५ वाजता रस्ता उद्घाटन व स्वागत समारंभ, सायं. ७ वाजता महाआरती, ७.३० वाजता पालखीनृत्य तर रात्रौ १० वाजता नवलादेवी नमन मंडळ कुर्णे मधली पडयेवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सर्वानी उपस्थीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री गणेश सेवा मंडळ मुंबई व ग्रामस्थ मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.