लांजा रेस्ट हाऊस ते बंजारा समाज मंदिरापर्यंत काढण्यात आली रॅली
लांजा( प्रतिनिधी) बंजारा समाजाचे थोर संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती गुरूवारी १५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने सकाळी ११.३० वाजता लांजा रेस्ट हाऊस ते बंजारा समाज मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली.
बंजारा समाज संघाच्यावतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला लांजा रेस्ट हाऊस या ठिकाणी आमदार राजन साळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी व पदाधिकाऱ्यांनी तसेच लांजा नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष सुनील कुरूप, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, युवा नेतृत्व अपूर्वा सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दाजी गडहिरे यांनी भेट दिली.मंडळाचे अध्यक्ष प्रवीण राठोड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रॅलीला सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि संत सेवालाल महाराजांचा नामाचा जयघोष करत लांजा रेस्ट हाऊस ते बाजारपेठेतून संत सेवालाल यांची रॅली ही बंजारा समाज मंदिरापर्यंत काढण्यात आली.
या रॅलीमध्ये मंडळाचे बंजारा समाज सेवा संघ लांजाचे सर्व पदाधिकारी व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












