लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन 

लांजा (प्रतिनिधी): प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येत आहे.

लांजावासियांचे आकर्षक ठरणाऱ्या या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सुरुवातीला सायंकाळी ५ वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री शिवछत्रपती पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेस ऐतिहासिक देखाव्यासह भव्य रॅली काढण्यात येणार आहे. शिवगंध प्रतिष्ठान, लांजा यांचे ढोल वादन आणि लांजातील शिवप्रेमी तरुणांकडून सादर करण्यात येणारा ऐतिहासिक देखावा हे या भव्य रॅलीचे खास आकर्षण असणार आहे.

शहरातील श्री केदारलिंग मंदिर पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी लांजा – राजापूरचे आमदार राजन साळवी, सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, दै.”रत्नागिरी टाइम्स” चे संपादक उल्हासराव घोसाळकर, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अजित यशवंतराव, मुंबईस्थित उद्योजक अनिल पत्याणे, निवृत्त उप अभियंता संतोष कनावजे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे व सरचिटणीस विजय पाटोळे यांनी केले आहे.