ओमनीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू

हडी येथील घटना : ओमनी गाडीतीलही दोघेजण जखमी

मालवण | प्रतिनिधी : देवगडहुन मालवणच्या दिशेने येणाऱ्या ओमनी गाडीने हडी पावणाई मंदिर येथील रस्त्यावर एका पादचाऱ्याला धडक दिली. भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले विलास विठोबा गावकर (वय ५२) यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. हा अपघात 15 फेब्रुवारी सकाळी ११ वाजता घडला. या अपघातात ओमनी गाडीतील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील हडी येथील विलास गावकर हे दर गुरुवारी वायंगणी येथील स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी जात असत. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पावणाई मंदीर एसटी स्टॉपवर ते गाडीची वाट पाहात असताना आचरा येथून मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ओमनी चारचाकी गाडीने विलास गावकर यांना धडक दिली. या धडकेत गावकर यांच्या पायावरून गाडी गेली व पलटी झाली. या भीषण अपघातात विलास गावकर हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. तर गाडीतील दोघे किरकोळ जखमी झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावकर यांना तातडीने गोवा येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच बांदा येथे मृत्यू झाला.गावकर यांचा मृत्यू झाल्याने हडी गावात शोककळा पसरली आहे. विलास गावकर यांच्या पश्चत पत्नी भाऊ भावजई असा परिवार आहे.