बांदा l प्रवीण परब : रोणापाल माऊली मंदिर परिसरातील विकासकामे होण्याची जबाबदारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतल्याने अखेर रोणापाल ग्रामस्थांनी दुसऱ्या दिवशी उपोषण मागे घेतले. सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी ना. केसरकर यांचा निरोप देत उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
रोणापाल येथील श्री देवी माऊली मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सार्वजनिक स्वच्छतागृह व्यवस्था करणे, हायमास्ट बसविणे या कामांसाठी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र या प्रस्तावाबाबत रोणापाल ग्रामपंचायत प्रशासन सहकार्य करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे निधी परत जाण्याची भीती आहे. याबाबत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेही लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी गुरुवार १५ पासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले.
गुरुवारी दुपारच्या सत्रात गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामसेवक प्रतिभा आळवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने उपोषण सुरूच होते. शुक्रवारी दुपारी उपोषण कर्त्यांची माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उप जिल्हाप्रमुख विनायक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, सातार्डा विभाग प्रमुख दिलीप परब यांनी भेट घेतली.
ग्रामपंचायत प्रशासन सर्व नियम धाब्यावर बसवून कारभार करीत आहे. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी त्याला खतपाणी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. रोणापाल गावासाठी प्रशासनाचे वेगळे नियम आहेत काय? असा संतप्त सवाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केला. तसेच ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा त्यांनी निषेध केला.
उपोषणावेळी माजी सरपंच प्रकाश गावडे, राजन परब, ग्रामपंचायत सदस्य नंदू नेमण, मंगेश गावडे, सुदिन गावडे, बाबल तूयेकर, न्हानू गावडे, निलेश नाईक, गणेश गावडे, मोहन गावडे, उदय गावडे, प्रदीप नाईक, सचिन कुबल, वैशाली गावडे, सारिका भोगटे, निकिता कुडव, सुनीता पायनाईक, जानकी गावडे, सुषमा सावंत, सोनाली गावडे, दर्शना गावडे, ज्योत्स्ना गोठसकर, पूर्वा नाईक, राजश्री नेमण, पार्वती गावडे, सत्यवती परब, प्राची गावडे, सुनील नाईक, रत्नप्रभा परब, सविता गावडे, सुषमा गावडे, वनिता गावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी बांदा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.











