वेंगुर्लेतील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर जत्रेला लोटला भाविकांचा जनसागर..

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्लेवासियांचे अढळ श्रध्दास्थान असलेल्या श्री देव मानसीश्वर जत्रोत्सवात आज देवदर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. पहाटेपासूनच देवाच्या चरणी भगवे शिड अर्पण करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.मानाचे पहिलं शिड देवाला अर्पण केल्यानंतर भाविकांची देवदर्शनासाठी रीघ सुरू झाली. सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांना दर्शनासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी सुंदर असे रांगेचे नियोजन करण्यात आले होते.

वेंगुर्ले शिरोडा मार्गावरच हे देवस्थान असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांमार्फत वाहतुकीची योग्य व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या प्रकारची दुकाने सजली होती. त्याचबरोबरच ठीक ठिकाणी विक्रीसाठी असलेली भगवी शिड आणि भाविकांच्या हातामध्ये असलेली भगवी शिड यामुळे परिसर भगवामय बनला होता.
शिवसेनेतर्फे भाविकांच्या सोयीसाठी मोफत सरबत व्यवस्था करण्यात आली होती. दिवसेंदिवस या धार्मिक स्थानाकडे वार्षिक जत्रोत्सवात भाविकांची संख्या वाढतच आहे.