
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूल शैक्षणिक संकुलात शिवजयंती अतिशय उत्साहाने गुरुदक्षिणा सभागृहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे नियोजन प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय यांनी केले.
या कार्यक्रमाला युनायटेड स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.पाटील मॅडम,पर्यवेक्षक श्री.मुंढेकर सर,प्रेमजीभाई आसर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. संगिता नाईक, शिशुविहार विभागाच्या विभागप्रमुख सौ.श्रुती रानडे व माध्यमिक तसेच प्राथमिक विभागाचे शिक्षक प्रतिनिधी व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इयत्ता चौथीचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या व सरस्वतीच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
प्राथमिक विभागातील शिक्षक श्री.मांडवकर सर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती केली याबद्दल सविस्तर माहिती दिली.
प्राथमिक विभागातील इयत्ता चौथी जाई वर्गातील विद्यार्थिनी कु. स्पृहा कलवारी हिने अत्यंत सुंदर शब्दात शिवरायांच्या संपूर्ण जीवनपटाविषयी माहिती सांगितली.
चित्रफितीव्दारे दाखविण्यात आलेला छ.शिवाजी महाराजांचा जीवनपट हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.ही चित्रफीत प्राथमिक विभागातील श्रीम.मानसी पाटील व सौ.मयुरी कोदारे यांनी तयार केली.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनगाथेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यामध्ये इयत्ता चौथी चाफा गटातील विद्यार्थिनींनी ‘झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा’ या गीतावरवर सुंदर नृत्य सादरीकरण केले .चौथी चमेली गटातील विद्यार्थ्यांनी ‘किल्ला मराठी मुलखाचा’हे गीत सादर केले. तर गुरुकुल विभागातर्फे बहारदार पोवाडा सादर करण्यात आला .
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला.ज्यामध्ये, शिवरायांचे नेतृत्व गुण,गनिमी कावा याविषयी चर्चा केली तसेच शिवरायांचे राज्यकारभारातील व्यवस्थापन, आरमाराचे जनक, स्त्रियांविषयी आदर तसेच दूरदृष्टीपणा असे शिवरायांचे विविध पैलू सांगितले.महाराजांनी आपल्याला शिकवलेली तत्त्वे व मूल्ये आपण आपल्या आचरणात आणावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता चौथी जुई गटातील विद्यार्थ्यांनी शिवरायांची सुंदर आरती सादर केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राथमिक विभागातील शिक्षक श्री.मांडवकर सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.











