शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे गौरवोद्गार
माजी मंत्री प्रवीण भोसले यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा
सावंतवाडी । प्रतिनिधी : राजकारणात राहूनही काही माणसे ही नेहमीच जमिनीवर राहतात. त्यातीलच एक म्हणजे प्रविणभाई. अनेक उच्च पदे भूषविली पण कधी आपली तत्वे त्यांनी विसरली नाहीत. तत्त्वाने काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून आजही त्यांच्याकडे बघितले जाते म्हणूनच आज ते सत्तेच्या कोणत्याही पदावर नसतानाही सर्वाना एकत्र घेऊन चालू शकले, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
माजी मंत्री प्रविण भोसले यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलच्या हाॅलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री रमाकांत खलप, खेमसावंत भोसले,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, ईशाद शेख, बबन साळगावकर रविंद्र भोसले, विकास सावंत, सुभाष गोवेकर, व्हिक्टर डॉन्टस बाबल ठाकूर पुंडलिक दळवी, ॲड.दिलीप नार्वेकर, नारायण सावंत, संजय पडते, रूपेश राऊळ, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, प्रवीण भोसले यांच्या सोबत जीवनात अनेक प्रसंग आम्ही अनुभवले पण नंतरच्या काळात राजकारणात ऐकामेका सोबत राहू शकलो नसलो तरी मैत्रीत कधीही ही खंड पडला नाही. प्रतापराव भोसले यांनी आपल्यावर जे संस्कार केले त्यामुळेच आपण जीवनात तत्त्वाने जगू शकलात. जीवनात राजकारणात अनेक उच्च पदे उपभोगली. मात्र, जेव्हा पदे नव्हती तेव्हा ही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. त्यांचा आवडता खेळ क्रिकेट असून जीवनात ही आपले शतक पूर्ण करतील, असा विश्वास मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.
यावेळी अर्चना घारे परब म्हणाल्या, प्रवीण भाईंसारखे वडिलांसमान मार्गदर्शक आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. वडिलकीच्या नात्याने ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेक माणसे जोडली. राजकारणात खिलाडूवृत्तीने राहून सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण कसे करावे हे भाईकडून शिकायला हवे. त्यांचे हे आशिर्वाद असेच कायम राहूदे व ते शतायुषी व्हावेत, अशा शब्दांत अर्चना घारे परब यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख संदेश पारकर रविंद्र भोसले, नकुल पार्सेकर, बबन साळगावकर आदिनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने सावंतवाडीकर नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवीण भाई प्रेमी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रविण भोंसले यांना अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सोबत गोवा राज्याचे माजी मंत्री रमाकांत खलप, अर्चना घारे परब, अमित सामंत, मनिष दळवी व अन्य












