शिवप्रेमी अशोक वनगे यांचे शिवविचार रुजवण्यासाठी प्रयत्न
संतोष कुळे | चिपळूण : तालुक्यातील बामणोली किजबिलेवाडी येथे शिवश्री अशोक महादेव यांनी आपल्या वास्तुशांतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचा पुतळा निवासस्थानी स्थापित केला आहे . शिवजयंती दिनी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
बामणोली सारख्या ग्रामीण भागामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापित करून शिवरायांचे विचार रुजवण्याचं काम वणगे यांनी केलेले आहे. हा पुतळा अशा ठिकाणी बसवला आहे की, उगवत्या सूर्यनारायणाची किरणे सकाळी या पुतळ्यावरती पडतात आणि मावळता सूर्य सुद्धा शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी आपली मावळती किरणे शिवरायांवरती पाडून मुजरा करतात. न ठरवताच अशी जागा आणि दुर्मिळ योग आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पुतळा बसवल्याचे सार्थक झाले आहे.
या पुतळ्याची मिरवणूक दिनांक 18 रोजी सायंकाळी ६ वाजता चिवेली फाटा ते बामणोली दरम्यान काढण्यात आली. चिपळूण येथील विघ्नहर्ता ढोल पथक आणि खालू बाजा यांनी मिरवणुकीची रंगत वाढवली. यावेळी बामणोलीमध्ये मिरवणूक आली असता शिवप्रेमी बौध्दवाडीतील महिला आणि ग्रामस्थांनी सुद्धा या मिरवणूकमध्ये सहभाग घेत शिवरायांच्या पुतळ्याला ओवाळणी करत पुष्पहार अर्पण केला. शिवराय आणि भिमराय या विचारांचे समीकरण दिसून आले. उद्योजक विराज कदम यांना ही बाब अतिशय भावली.
त्यानंतर दिनांक १९ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के आणि राजेश खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आ. भास्कर जाधव, माजी आ. डॉ. विनय नातू , रघुनाथ शिर्के, कुणबी संघ शाखा ग्रामीण चिपळूणचे अध्यक्ष पत्रकार संतोष कुळे, सुधीर तांबे, उद्योजक विराज कदम, राजेश खेडेकर, माजी जि. प. सदस्या नीलम गोंधळी, महेश कातकर, अजित थरवल, अरविंद खांबे , उद्योजक भालचंद्र जोगले, सर्व गावचे सरपंच, गावातील ग्रामस्थ, आदी मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होती. दोन दिवसाचा या कार्यक्रमांमध्ये सर्व शिवप्रेमींनी उपस्थिती दर्शवली होती. १९ तारखेला संध्याकाळी ह भ प कीर्तनकार ईश्वरी येसरे हिने शिवचरित्रावरती कीर्तन सादर केले. या कार्यक्रमात सुद्धा श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
शिवरायांच्या पुतळा स्थापित करून एक नवा आदर्श नव्या पिढीसमोर श्री वनगे यांनी ठेवला आहे. नक्कीच यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल असे माजी आ. विनय नातू यांनी सांगितले. गृहप्रवेशाचे औचित्य साधून शिवचरित्र आणि शिवप्रेमींनी महाराजांचे दर्शन गावात व्हावे यासाठी श्री वणगे यांनी पुतळा स्थापित केला आहे.
या कार्यक्रमाला आदर्श विद्यामंदिरची चिवेलीचे विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा कौंढरताम्हाणे, जिल्हा परिषद शाळा वाघिवरे, जिल्हा परिषद शाळा बामणोली येथील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक व शिक्षक सुद्धा आवर्जून उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना अशोक वनगे यांनी भेटवस्तू देत त्यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमासाठी नवजवान मित्र मंडळ आणि महिला मंडळ किजबीलेवाडी यांचे सहकार्य लाभले. सर्वांच्या सहकार्यातून हा सोहळा पार पडला. अशोक वणगे यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास किजबीले आणि पत्रकार संतोष कुळे यांनी केले.











