रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यात करबुडे, दाभीळ – आंबेरे,वाटद-मिरवणे या तिन ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये आंबा, काजूसह विविध बागांचे सुमारे आठ ते दहा लाखाचे नुकसान झाले आहे.या तिन्ही ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.
भातशेतामध्ये भाजावळ करत असताना वाऱ्यामुळे ही आग पसरल्यामुळे नुकसान झाल्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे. नुकसान झालेल्यामध्ये जयगड महसूल मंडळातील वाटद -मिरवणे गावात अचानक लागलेल्या वणव्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील सुमारे सात खातेदारांच्या आंबा बागा जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये सुमारे दोनशेहून अधिक झाडांचा समावेश आहे. दाभिळ-आंबेरे येथील संजय भालचंद्र पाटकर यांच्या कलम बागेला आग लागुन अंदाजे 3 लाख 75 हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक लोकांच्या प्रयत्नातून आगिवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तर करबुडे येथील बागायतदार सावंत यांच्या आंबा बागेतील 100 ते 125 झाडे जाळून खाक झाली. या बागेतील बहूसंख्य झाडांना कैरी आणि मोहोर होता. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.












