रत्नागिरी : शिवसेनेचे जुने जाणते नेते, व्यासंगी, सुसंस्कृत राजकारणी, समाजसेवक मनोहरपंत जोशी सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या निधनाने आदर्श राजकारणी हरपला अशा शब्दांत माजी आमदार बाळ माने यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. जोशी सरांचे आज मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बाळ माने म्हणाले की, नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आम्हा सर्वांना मार्गदर्शक म्हणावा लागेल. त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. मुख्यमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय म्हणावी लागेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. मुख्यमंत्री असताना त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले आहे. त्यांच्यासारख्या नेत्यांचा आदर्श आम्हा राजकारण्यांनी घेतला पाहिजे. भाजप-शिवसेना युती असताना त्यांच्याशी बोलणे व्हायचे. माझ्या आमदारकीच्या काळातही स्व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्याप्रमाणेच त्यांचेही मार्गदर्शन मला लाभले होते.












