चिपळूण वालोपे येथील घटना
चिपळूण : वालोपे येथील लक्ष्मी अनंत हरचिरकर या 70 वर्षीय वृद्धेचा अत्यंत निर्घृणपणे खून झाल्याचे उघड झाले आहे.
वृद्धेला अमानुषपणे मारहाण करून शेतात फरफटत नेत ठार मारून शेतात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला आहे. जमिनीच्या वादातून हा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रकाश गणपत हरचिलकर (49) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मृत वृद्धेच्या मुलाने विनोद अनंत हरचिलकर याने चिपळूण पोलीस स्थानकात तक्रार दिली. त्यानुसार लक्ष्मी हरचिरकर (वय 70) ही वृद्ध महिला आपल्या दोन मुलांच्या बरोबर वालोपे वरचीवाडी येथे राहत होती. सामायिक जमिनीवरून हरचिरकर कुटुंबात गेले काही महिने वाद सुरू होते. अनेकवेळा या विषयावरून भांडणे देखील होत होती. परंतु जमिनीचा हा वाद इतका पराकोटीला जाईल याची कल्पना कोणालाच नव्हती.
शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता लक्ष्मी हरचिलकर या मुंबई गोवा महामार्गलागत असलेल्या एकविरा हॉटेल मागे असलेल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तीला एकटीला गाठून प्रकाश आडवीलकर याने तीच्या डोक्यात खिळा मारून ठार केले. पुरावा नष्ट करण्यासाठी वृद्धेचा मृतदेह पेंढा, टायर वापरून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रकाश गणपत हरचिलकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार लक्ष्मी हरचिरकर ही दोनच दिवसापूर्वी ती पंढरपूर यात्रा करून आली होती.












