वीर सावरकरांचे समग्र जीवन एक धगधगते अग्निकुंड : भाऊ सामंत

 

मालवण येथे वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी

मालवण | प्रतिनिधी : वीर सावरकरांचे समग्र जीवन एक धगधगते अग्निकुंडच होते. देव, देश आणि धर्मासाठी विर सावरकरांचे जीवन व्यापून गेले होते. सावरकरांच्या जीवनामध्ये थोर क्रांतिकारक, राजकारणी, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक, वकील असे एक ना अनेक पैलू आपणास पहावयास मिळतात, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख भाऊ सामंत यांनी केले.

सोमवारी मालवण भरड येथे भाऊ सामंत यांच्या आस्थापना ठिकाणी वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. वीर सावरकरांच्या पुतळ्यास भाऊ सामंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नमन करण्यात आले.

यावेळी संदीप बोडवे, प्रशांत हिंदळेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, महेश कदम, भूषण मेथर, ओंकार यादव, पपू पोखरणकर, भिवा शिरोडकर, नंदू वस्त, चेतन मुणगेकर, यांसह अन्य उपस्थित होते.

वीर सावरकरांच्या जीवनावर बोलताना भाऊ सामंत म्हणाले, सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी सावरकरांनी लढा दिला. जन्मठेपेच्या शिक्षे वेळी मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर मातृभूचे स्वातंत्र्य! हे एकच ध्येय होते.

तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली. सावरकरांनी सर्व समावेशक अशा व्यापक ‘हिंदुत्वाची’ संकल्पना मांडली होती. सावरकरांची हीच संकल्पना घेवून आपण सर्वांनी पुढे वाटचाल करावी असेही शेवटी सामंत म्हणाले.

उपस्थितांचे आभार व्यक्त करताना वीर सावरकरांच्या विचारांची ज्योत अशीच अखंडितपणे तेवत ठेवूया असे आवाहन संदीप बोडवे यांनी केले.