पेडणे (प्रतिनिधी) :
पेडणे तालुक्यातील धारगळ सुके कुळण येथे मोटरसायकलला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने झालेल्या अपघातात संजय सुरेश जळवी (४९, रा. पेंडूर, ता. वेंगुर्ले) हा तरुण जागीच ठार झाला. संजय जळवी हे मोटरसायकलने कामावरून येत असताना त्यांना अज्ञात वाहनाने ठोकरले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. पेडणे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. अपघातस्थळी पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मदतकार्यात सहभाग घेतला.
मयत संजय जळवी हे गोव्यात पेट्रोल पंपावर कामाला होते. ड्युटी आटोपून ते मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या मोटरसायकलने (एमएच- ०७- ७१६१) घरी येत होते. धारगळ सुकेकुळण उड्डाण पूलाच्या जवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. यात संजय जळवी हे रस्त्यावर कोसळले व जागीच मयत झाले.

त्याच दरम्यान पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना पाचारण केले. अपघात घटना अत्यंत दुर्दैवी असून अपघाताला कारणीभूत असणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.
घटनास्थळी मोपा सरपंच सुबोध महाले यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. मयत संजय जळवी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. जळवी यांच्या अपघाती निधनाने पेंडूर गावावर शोककळा पसरली आहे.
————












