सावंतवाडी : आंबोली येथे वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी तसेच विनापरवाना बंदूक बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सहाही जणांना सोमवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची प्रत्येकी ५० हजाराच्या सशर्थ जामीनावर मुक्तता करण्यात आली. या कामी ॲड. परिमल नाईक यांनी काम पाहिले.
फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नांडिस (वय ४२, दोघे ही रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय २३) दोघे (रा. बांदा गडगेवाडी),अरबाज नजीर मकानदार (वय २६, रा. माठेवाडा) अशी त्यांची नावे आहेत.
संबंधित सहाही जणांना आंबोली हिरण्यकेशी येथे शिकार करताना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून बंदुक, सुरा आणि इनोव्हा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आज त्यांच्याकडून जामीन साठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी त्यांची प्रत्येकी ५० हजाराच्या सशर्थ जामीनवर मुक्तता करण्यात आली.











