सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकावर एसीबीची कारवाई

सावंतवाडी । प्रतिनिधी :जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सावंतवाडी भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापकाला लाच लूचतपत प्रतिबंधक विभागाने जाळ्यात पकडले. ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) असे या लोकसेवकाचे नाव असून, त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणातील ४३ वर्षीय तक्रारदारांची सावंतवाडी तालुक्यातील समाईक जमिनीची पोट हिस्सा मोजणी प्रलंबित होती. तक्रारदारांच्या सहहिस्सेदाराने मोजणीसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडी येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. हे काम पूर्ण करून देण्यासाठी परिरक्षण भूमापक ओमकार आपटे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी एसीबीच्या सिंधुदुर्ग युनिटकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत पथकाने सापळा रचला. पडताळणी दरम्यान, आपटे याने तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. लाच मागणीचे तथ्य निष्पन्न होताच पथकाने कारवाई केली.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दिपक माळी, सुनील सावंत, प्रीतम कदम, गोविंद तेली, विजय देसाई, महेश जगताप, भूषण नाईक, योगेश मुंढे, स्वाती राऊळ, रूपा आईर आणि चालक नागेश खोत यांनी केली आहे.

या कारवाईदरम्यान संबंधित भूमापकाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.