
सुनबाई तोऱ्यातच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसादात
हे श्रेय वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचे …..ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक राजाभाऊ पटवर्धन यांचे गौरोद्गार
राजन लाड | जैतापूर : राजापूर तालुक्यातील बाकाळे येथील ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन साकारलेला ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर लिखित सुनबाई तोऱ्यात या नाटकाचा नाट्यप्रयोग छत्रपती श्री शिवाजी मंदिर मुंबईच्या रंगमंचावर रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री आठ वाजता हाउसफुल गर्दीत सादर झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील कालाकारांच्या अभिनयाने रंगलेली ही सुनबाई तोऱ्यात मुंबईत मात्र जोमात होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी या नाटकाचे कौतुक करत कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनीच लिहिलेल्या सुनबाई तोऱ्यात या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचंड गर्दी केली होती. अशा प्रकारे ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन साकारलेल्या या नाटकाचे सारे हे श्रेय वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचेच असल्याचे गौरोद्गार ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक राजाभाऊ पटवर्धन यांनी काढले.
या प्रयोगादरम्यान संपन्न झालेल्या सत्कार समारंभाच्या वेळी राजाभाऊ पटवर्धन यांनी ग्रामीण भागातून आलेल्या या कलाकारांचे स्वागत करतानाच पूर्वी मुंबईत नाटके बसवून गावात त्याचे प्रयोग होत असत मात्र आता ग्रामीण भागातून आलेल्या कलाकारांना मुंबईसारख्या मोठ्या नाट्यगृहामध्ये संधी मिळते आहे याचे सर्व श्रेय आयोजकांसहित ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना द्यावेत लागेल असे प्रतिपादन केले.
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर आपल्या माडबन या गावी मुक्कामी आल्यापासून ग्रामीण भागात चळवळ सुरू ठेवली आहे. यापूर्वी त्यांनी स्थानिक कलाकारांना घेऊन साकारलेले संगीत विठ्ठल विठ्ठल हे नाटक थेट विठुरायाच्या पंढरपुरात देखील सादर करण्याची संधी स्थानिक कलाकारांना मिळवून दिली होतीतर आपल्याच संगीत वस्त्रहरण या नाटकाचा स्थानिक कलाकारांच्या संचातील नाट्यप्रयोग स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात देखील सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.
आता बाकाळे येथील नवख्या स्थानिक कलाकारांच्या संचातील नाटक साकारण्याबरोबरच स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांना मुंबईतील भव्य नाट्यगृहात नेऊन हाउसफुल गर्दीत नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी उपलब्ध करून देत ग्रामीण भागात ही नाटकाची चळवळ समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
या नाटकाचे दिग्दर्शन सुरेश चेऊलकर , संगीत सागर कणेरी ,सचिन कणेरी, नेपथ्य अंकुश कांबळी आणि सहकारी ,रंगभूषा उल्लेष खंडारे, ध्वनी आणि प्रकाश श्रीनिवास तारकर तर या नाट्यप्रयोगाचे व्यवस्थापन बाकाळे आणि काजुरमळी स्थानिक आणि मुंबई स्थित ग्रामस्थांनी केले आहे. तर पत्रकार राजन लाड यांसह राकेश दांडेकर सुनील करगुटकर यांचे विशेष सहकार्य लाभले .
या नाटकामध्ये सुरेश चेऊलकर, अजयकुमार रांबाडे, चेतन रांबाडे, केतन रांबाडे, रुपेश चव्हाण, महेंद्र पोवार ,प्रमोद पोवार सौ .मंजिरी कणेरी, सौ .चित्रा रांबाडे आणि कुमारी आकांक्षा पंगेरकर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
मुंबई येथे भरत कणेरी ,अनंत पाळेकर ,संजय रांबाडे यांसह त्यांचे सर्व सहकारी तसेच बाकाळे आणि काजूरमळी स्थानिक आणि मुंबईकर ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी या नाट्यप्रयोगासाठी मेहनत घेतली होती.या नाट्यप्रयोगाच्या दरम्यान बाकाळे काजूरमळी गावातील उच्चशिक्षित युवक युवती, उद्योजक आणि व्यावसायिक, प्रयोगातील सर्व कलाकार व त्यांना सहकार्य करणारे सर्व तंत्रज्ञ तसेच लेखक गंगाराम गवाणकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन भरत कणेरी यांनी केले .बाकाळे काजुरमळी स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांच्या वतीने नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.










