जलाल राजपूरकर यांचे उपोषण स्थगित

खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील देवणे पूल आणि जोड रस्त्याच्या निकृष्ट व दर्जाहीन काम तोडून संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा करून घेणार असल्याचे लेखी पत्राद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता आशा जटाळ यांनी २७ रोजी दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जलाल राजपूरकर यांनी उपोषण मागे घेतले आहे. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खाडीपट्टा भागातील४० गावांसाठी महत्त्वाचा असलेल्या पूलव रस्त्याचे गेल्या काही वर्षापासून बंधकाम सुरू आहे. जनतेच्या दळण वळणाच्या दृष्टिने महत्त्वाचा ठरलेल्या देवणे पुल आणि जोड रस्त्याचे काम निकृष्ट व दर्जाहीन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे. संबंधित प्रकाराला जे कारणीभूत आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करावी व काम दर्जेदार करावे अशी मागणी करत राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी जलाल राजपूरकर यांनी २६ पासून येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते. यावेळी त्यांनाविविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
२७ रोजी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, रविकिरण प्रभू, विमालकुमार जैन, सचिन पवार, उमेश देवरुखकर, यांच्यासह अनेक जणांनी उपोषण स्थळी राजपूरकर यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता आशा जटाळ यांनी भेट दिली. यावेळी कामाबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या हस्ते सरबत स्वीकारून उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.