खेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे रणांगण गाजवून भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक महापौर पदे पटकावत सर्वोच्च स्थान मिळवले. या अभूतपूर्व कामगिरीचा उत्सव संपूर्ण राज्यभर साजरा होत असताना खेड शहरातही भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप नेते व माजी नगराध्यक्ष श्री. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य स्वरूपाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल–ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने चौक दणाणून गेला. कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करत एकमेकांचे अभिनंदन केले. वैभव खेडेकर यांनी स्वतः उपस्थित नागरिकांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला. परिसरात देशभक्तीपर आणि उत्साहवर्धक घोषणांचा निनाद सुरू होता.
या कार्यक्रमाला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा मोर्चाचे सरचिटणीस श्री. मिलिंद नांदगावकर, गटनेते व नगरसेवक श्री. रहीम सहिबोले, श्री. भालचंद्र (नंदू) साळवी, श्री. वैजेश सागवेकर, श्री. राजा जोयसर, श्री. संदीप सासणे, श्री. स्वरूप माजलेकर, श्री. विशाल गुप्ता, श्री. प्रदीप भोसले, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार हे देखील उपस्थिती होते.












