जय-पराजय आणि राणे…!

लोकसभा निवडणुकीच बिगुल केव्हाही वाजेल म्हणजे निवडणुक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात जाहीर करेल असं अपेक्षित आहे. निवडणुका केव्हाही होऊ दे परंतु त्याची वातावरण निर्मिती व्हायला सुरूवात झाली आहे.

कोकणातील रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असतील याची उत्सुकता निश्चितच महाराष्ट्राला असणार आहे. रायगड मतदार संघाचे नेतृत्व खा.सुनिल तटकरे करीत आहेत. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व खा.विनायक राऊत करीत आहेत. २०१९ च्या सर्वच निवडणुकांतील संदर्भ आजच्या घडीला पुर्णत: बदलले आहेत. महाराष्ट्राच राजकारणही त्याचप्रमाणे बदलले आहे. २०१९ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघात खा. सुनिल तटकरे यांनी भाजपा-शिवसेनेतर्फे निवडणुक लढविणाऱ्या माजी केंद्रिय मंत्री अनंत गिते यांचा पराभव करून खा.सुनिल तटकरे निवडून आले.

तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ निवडणुकीत खा. विनायक राऊत यांनी भाजपा-शिवसेना युतीतर्फे निवडणुक लढवली होती. आणि त्यांच्या समोर उमेदवार होते. स्वाभिमानपक्षातर्फे माजी खा.निलेश राणे पक्षचिन्ह नवीन मात्र तरीही साडेतीन लाख मत निलेश राणे यांनी घेतली.

खा.विनायक राऊत तेव्हा निवडून आले. आता २०२४ साली होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे खा.विनायक राऊत निवडणुक लढवणार आहेत. भाजपा शिवसेना युतीतर्फे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार कोण असेल ? याची राजकीय चर्चा होत असली तरीही भाजपा-शिवसेनेने अजुनही आपले पत्ते ओपन केलेले नाहीत.

निवडणुका जाहीर झाल्या की आपोआपच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू असते. मग ती निवडणुक ग्रामपंचायतीची असो किंवा विधानसभा, लोकसभेची निवडणुक असली तरीही चर्चा करायला काय जातय म्हणत लोक सहज चर्चा करतात. त्याला खरंतर कोणतीच निवडणुक अपवाद नाही आहे. तशी चर्चा लोकसभा निवडणुकीतही होत आहे. कोणता लोकसभा मतदार संघ कोणत्या पक्षाच्या वाट्याला येणार आहे याची प्राथमिक चर्चा सर्वच पक्षांमध्ये सध्या सल्ला मसलत होत आहेत. अर्थात देशाच्या निवडणुका असल्या किंवा महाराष्ट्रातील निवडणुका असल्या तरीही निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा मात्र कोकणची आणि कोकणच्या निवडणुकांचीच होत असते.

कोकणातील रायगड मधून पुन्हा एकदा खा. सुनिल तटकरे विरूद्ध माजी केंद्रिय मंत्री अनंत गिते अशी लढत होणार काय हे पहाणं फार औत्स्युक्याच आहे. १९९० साली कोकणातील राजकारणात विद्यमान केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांची एण्ट्री झाली आणि पुढची ३४ वर्षे नारायण राणे यांनी कोकणच्या राजकारणात आपला ठसा कायम ठेवला आहे. आज जेव्हा लोकसभा निवडणुकीची सहज कुठेही चर्चा होते तेव्हा केंद्रिय मंत्री ना.नारायण राणे निवडणुक लढवणार असतील तर शंभर टक्के राणे विजयी होतील असं सहज कोणीही बोलून जातो.

त्याची कारणही तशीच आहेत. खरंतर ना. नारायण राणे यांचा कोकण हा ‘विक पॉइंट’ आहे. कोकणचा विकास या एकमेच उद्देशाने झपाटलेल हे व्यक्तिमत्व आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खा.विनायक राऊत यांनी या लोकसभा निवडणुकीत निवडणुक लढवायला नारायण राणे घाबरले आहेत ते पळ काढत आहेत. असली राजकीय तथ्यहिन स्टेटमेंट खा.राऊत यांनी केली आहेत. घाबरणे आणि पळ काढणे हे दोन्ही शब्द केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे या व्यक्तिमत्वाच्या जवळपासही नाहीत. त्यांना जे योग्य वाटत ते स्पष्टपणे बोलणे… परिणाम आणि राजकीय बेरीज-वजाबाकी त्यांनी आजवर कधीच केल्याची माहिती कोणीही सांगू शकणार नाही. उलट रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात गेली दहावर्षे कोणती विकास काम केली हे खा. विनायक राऊत किंवा शिवसेना सांगू शकत नाहीत.

कोणतेही प्रकल्प नाहीत की आणखी काहीही नाही सांगण्यासारख कोणतही एकही काम नाही. टॉवरची उभारणी त्याचे उद्घाटन परंतु टॉवरना रेंजच नाही. हा अनुभव अखंड कोकणात घेण्यात आला आहे. आणि मग खा. विनायक राऊत असतील की त्यांचे आमदार असतील फक्त केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांच्यावर टिका हा एककलमी कार्यक्रम खा.विनायक राऊत यांनी कोकणात राबवला आहे. स्वत:च्या कार्य, कर्तृत्वाची रेषा मोठी करण्यासाठी टिका-टिप्पणी करून प्रयत्न केला. परंतु नारायण राणे यांच्या कार्य कर्तृत्वाची रेषा एवढी मोठी आहे की त्या जवळपासही कोणी पोहचू शकत नाही. ही वस्तुस्थिती उबाठाचे नेतेही खाजगीत बोलून दाखवतात. त्यामुळे केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे हे निश्चितच विजयी होतील हे खा. विनायक राऊत यांनाही याची पूर्ण कल्पना आहे.

जाता-जाता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बारकाईने पाहिल्यास एक बाब स्पष्ट होते. केंद्रिय मंत्री ना. नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळातील विधानसभा, विधानपरिषद, संसदेत राज्यसभा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री अशा सर्व उच्च पदांवर नारायण राणे विराजमान झाले. कार्य कर्तृत्वाचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. विकासाची वेगळी दृष्टी असणारा नेता ही इमेज त्यांनी अथक परिश्रमाने निर्माण केली जपली. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी पराभव पत्करावा लागला. परंतु २०१४ ते २०२४ गेल्या दहावर्षात नारायण राणे यांनी जी गरूड झेप घेतली ती सर्वांना थक्क करायला लावणारीच आहे. राणे संपले असं जे म्हणत होते ,ज्यांना वाटत होतं ते मात्र गेल्या दहावर्षातील राणेंचा प्रवास पाहून आज काही बोलत असतील ती त्यांची अगतीकता आहे. त्यामुळे २०२४ मध्ये केंद्रिय मंत्री नारायण राणे लोकसभागृहात दिसले तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नियती ज्यांच्या सोबत असते त्यांना रोखणं अवघड असत. एवढं निश्चित.