– प्रा. मनिषा रत्नाकर रावराणे
परी गीताईश्वरू भोळा | ले व्यासोक्तिकुसुममाळा । तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे की ॥ (अध्याय १८ ओवी १७१०),
गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे, म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करितो व आमचे गरिबाचे दुर्वांकुरासही नाही म्हणत नाही. ज्ञानदेवांच्या नम्रतेबद्दल काय बोलावं? स्वतःच्या अठराशे रसाळ, ज्ञानवंत ओव्यांना ते गरिबाचे दुर्वांकुर म्हणतात. याहून नम्रतेची परिसीमा काही असू शकते!
त्याचबरोबर पहिल्या ओवीतून श्रीव्यासमुनींविषयीचा आदर, भक्तिभाव प्रकटतो नि भगवद्गीतेचं वर्णन गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे, असं केलेलं! भगवद्गीता ही ईश्वरच खरी, कारण साक्षात भगवान श्रीकृष्ण व परमभक्त अर्जुन यांच्यातील तो संवाद आहे ज्ञानाने परिपूर्ण करणारा. + ज्ञानदेवांनी हा गीतारूप ईश्वर भोळा म्हणून केलेलं वर्णन अतिशय लायरी श्री ज्ञानेश्वरी हृदयंगम आहे. श्रोते-वाचक यांच्या हृदयाचा ठाव घेणारा हा दृष्टान्त!
या ओवीतील ‘ना न म्हणे की’ हे उद्गार या ओवीला अधिक जिवंत, नादमय, गोचर करतात. माझी ‘ना’ नाही असं माणूस बोलून जातो. नेहमीच्या व्यवहारात तोच संवाद इथे आणून, इथे बसवून ज्ञानदेव त्याला किती काव्यात्म रूप देतात हे पाहण्याजोगं, विचार करण्याजोगं नि चिंतन करण्याजोगं!
पुन्हा यात अजून एक विचार व सौंदर्य आहे. व्यासोक्ति ही कुसुममाळा, तर माझे फक्त दुर्वांकुर, असे म्हणून ज्ञानदेव व्यासमुनींना महत्त्व देऊन स्वतःकडे कमीपणा घेतात. त्याही पुढे जाऊन व्यासांची पुष्पमाला गीताईश्वर धारण करतो व माझ्या दुर्वांकुराला ना म्हणत नाही. यात अजून एक सौंदर्याची कुपी दडलेली आहे. माझे दुर्वांकुर धारण करतात, असं म्हणत नाहीत, तर माझ्या दुर्वांकुरांना ‘ना’ म्हणत नाही, असं ज्ञानदेव वर्णितात.
यातून ते व्यासमुनींना अधिक उंचावर नेऊन ठेवतात व स्वतःला अधिक खाली आणतात. या विरोधाभासातून त्यांना हवं ते साधतात. जसं पांढऱ्यावरील काळा रंग उठून दिसतो, त्याप्रमाणे व्यासमुनींच्या पुष्पमाला धारण करणं या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवांच्या दुर्वांकुरांना ‘ना’ न म्हणणं हे अधिक ठळक होतं. ही सौंदर्यदृष्टी हा तर ज्ञानदेवांचा खास विशेष होय.











