“तटरक्षक दलाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांशी संवाद महत्त्वपूर्ण “

भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर
पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने रत्नागिरी येथे निमंत्रित पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेचे आयोजन 

रत्नागिरी : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या मुंबईच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे आज, 29 फेब्रुवारी 2024 रोजी रत्नागिरी येथे एकदिवसीय ‘वार्तालाप’ या माध्यम परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘’कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास” या विषयावर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन आज सकाळी भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर,कौशल्य विकास मंत्रालयाचे सहसंचालक अभय महिषी, पर्यटन मंत्रालयाचे (मुंबई) प्रादेशिक संचालक डी. व्यकंटेशन, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले .पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी आणि सहाय्यक संचालक निकिता जोशी यावेळी उपस्थित होत्या.

 

यावेळी उपस्थित भारतीय तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक गिरीश चंदर यांनी माध्यमांशी उत्तम संवाद आपल्या कार्यात साहाय्यभूत होतो, असे प्रतिपादन केले.”रत्नागिरीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे समुद्रकिनारा.यामुळे इथे तटरक्षक दलाचे काम खूप महत्त्वाचे आहे. हे काम कसे चालते, हे सर्वसामान्यांना समजण्यासाठी पत्रकारांशी संवाद आवश्यक आहे. हाच प्रयत्न वार्तालापच्या माध्यमातून केला जात आहे,” असे त्यांनी सांगितले.

पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी यांनी पत्र सूचना कार्यालयाच्या कामाविषयी माहिती दिली.पत्र सूचना कार्यालय ही केंद्र सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि आजवरचे यश याबाबतची माहिती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत अधिकृतरित्या पोहचवणारी मध्यवर्ती यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र सूचना कार्यालय विविध विषयांवरच्या चर्चासत्रांचे आयोजन करते. अशी चर्चासत्र म्हणजे, तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि त्याचवेळी सरकार आणि माध्यमांमधे एक दुवा निर्माण करणारे माध्यम आहे, असे जयदेवी पुजारी-स्वामी यांनी सांगितले.

“कोकणातील लोक ही माहितीने परिपूर्ण असून अप टू डेट असल्याचे इथे काम करताना निदर्शनाला आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे कामही एक पाऊल पुढे असायला हवे,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी केले. शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांना माहिती होण्यासाठी वार्तालाप उपक्रम उत्तम असल्याचे कौतुक त्यांनी केले.”शासकीय योजना तळागाळात प्रभावीपणे पोचवण्यात पत्रकारांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदमार्फत विविध योजनांची अंमबजावणी केली जात असते. मात्र काहीवेळा प्रशासनाला गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अडथळे येतात, अशावेळी प्रसारमाध्यमांची मोठी मदत होते,” असे ते म्हणाले.”प्रशासन समाजमाध्यमाच्या माध्यमातून लोकांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानामुळे वेगाने माहिती पसरते; मात्र ती खरी आहे की खोटी याची पडताळणी करूनच ती इतरांना पाठवायला हवी. तंत्रज्ञानाचा वापर करून चांगली आणि उपयोगी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.” असे आवाहन कीर्ती किरण पुजार यांनी केले.

तटरक्षक दल,केंद्रीय पर्यटन विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय ,कोकण रेल्वे आणि नारळ संशोधन केंद्र या विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

नंतरच्या सत्रात तटरक्षक दलामार्फत समुद्रकिनाऱ्यावर राहणारे नागरिक आणि सागरी मच्छिमार यांच्या सुरक्षिततेबाबत असिस्टंट कमाडन्ट मनीष सिंग सादरीकरण केले.

‘शाश्वत स्थानिक उपक्रमांद्वारे कोकण प्रदेशातील पर्यटन क्षमता खुली करणे’ यावर मुंबईच्या केंद्रीय पर्यटन विभागाचे प्रादेशिक संचालक डी.वेंकटेशन यांनी सादरीकरण केले. पर्यटन हा प्रत्येक व्यवसायाचा भाग आहे तसेच पर्यटनातून अनेक रोजगार-व्यवसायाला चालना मिळत असल्याचे पर्यटन मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक डी. व्यंकटेश यांनी सांगितले. पर्यटन मंत्रालय ग्रामीण पर्यटन विकासासाठी करत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. पर्यटन विकासाच्या आणखी अपार क्षमता रत्नागिरी जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात त्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी रत्नागिरीतील सण, उत्सव तसेच अनेक वारसास्थळे दुर्लक्षित असल्याचा प्रश्न रत्नागिरीतील पत्रकारांनी मांडला. जिल्ह्यात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे केंद्र व्हावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली. यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला जाईल असे उपस्थितांकडून सांगण्यात आले.

 

उद्योगधंद्यांना अनुरूप कौशल्य विकासाचे काम, कौशल्य विकास मंत्रालयाकडून केले जाते असे सांगून कौशल्य विकास मंत्रालयाचे सहसंचालक अभय महिषी यांनी मंत्रालयाच्या कामाची माहिती दिली. कौशल्य विकास मंत्रालय जिल्हानिहाय उपाययोजना करत आहे. युवांमध्ये कौशल्य विकास करून योग्य उद्योजकांशी त्यांचा संपर्क करून देण्याचे कामही मंत्रालय करत असल्याचे महिषी यांनी सांगितले.

शेवटच्या सत्रात ‘ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल’ या विषयावर पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जोशी यांनी पत्रकार कल्याण योजना आणि पी आय बी फॅक्ट चेक याविषयी सविस्तर माहिती दिली.

लाभार्थ्यांच्या अनुभव कथनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.लखपती दीदी, एक स्थानक एक उत्पादन आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे झालेल्या लाभाबद्दल समाधान व्यक्त केले.

 

रेल्वे मंत्रालयाच्या ‘एक स्थानक एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरीतल्या 33 उद्योजकांना संधी मिळाली आहे. प्राचीन कोकणचे वैभव सरदेसाई यांनी या योजनेमुळे आपल्या लाकडी खेळणी उत्पादनाला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

कोकण रेल्वेच्या वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेच्या लाभार्थी, फणसोप, रत्नागिरी येथील जान्हवी भुरवणे यांनी त्यांच्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील समर्थ फूड्स या कोकणी मेव्याचा स्टॉलचा अनुभव सांगितलं. त्यांच्या खाद्य पदार्थांना कोकण पट्ट्यात मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या लखपती दीदी या योजनेचा लाभ घेतलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या लखपती दीदी, चिपळूण तालुक्यातील संयुक्ता गुजर यावेळी उपस्थित होत्या. 12 महिलांनी चालवलेल्या या सखी समूहातील महिला नाचणी पासून पाच प्रि मिक्स तयार करतात.

नारळ संशोधन केंद्राच्या उपक्रमांचा गुहागर मध्ये अनुसूचित जातीच्या 163 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. या केंद्रातून नारळ काढणीचे , नारळ मित्र प्रशिक्षण घेतलेल्या प्रियांका नागवेकरआणि शाम्भवी नागवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

केंद्र सरकारच्या जल जिवन मिशन चे लाभार्थी ग्रामपंचायत लांजा तालुक्यातील इंडवटी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद गुरव यानी आपले अनुभव सांगितले.

बचत गटातील महिलांना योजना चालवण्यासाठी देऊन एक नवीन उपक्रम राबविला. 100 कुटुंबाच्या या गावातील 34 बचत गटातील महिलांना मार्गदर्शन देण्यात आले. या महिला आता पाणी स्वच्छता, पाणी पट्टी वसुली, पाणी वितरण व्यवस्था ही काम करतात. जल नळ योजनेतून गावातील महिला आणि पुरुषांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.