वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले येथील प्रिं. एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक तथा दत्तराज कन्स्ट्रक्शनचे मालक श्री. रघुवीर (भाई ) मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे – परब, वेताळ प्रतिष्ठान चे संस्थापक डॉ. सचिन परुळकर, बॅ. बी. के. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. बी. चौगुले , माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका सौ. मिताली होडावडेकर, विद्यार्थी प्रतिनिधी कु. चिन्मय पेडणेकर, कु. निधी पालकर इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला इ. 9 वीच्या मुलींनी इशस्तवन सादर केले. यानंतर पाहुण्यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळाबाह्य विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. सन 2023-24 मध्ये शाळेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मा. सौ. अर्चना घारे – परब, मा. डॉ. सचिन परुळकर, मा. डॉ. एम. बी. चौगुले, यांनी मार्गदर्शन केले. मा. डॉ. आनंद बांदेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर यांनी इंग्लिश मिडियम स्कूलची उभारणी करून गोरगरीब जनतेच्या मुलांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घेता यावे म्हणून पर्वणी उभारली त्यामुळेच या स्कूल मधील विद्यार्थी व विद्यार्थीनी अभ्यासाबरोबर शाळा बाह्य कार्यक्रमात यशस्वी होतात तसेच सुरुवातीपासूनच पालकांची साथ स्कूलला मिळत आहे. त्याबद्दल पालकांचे अभिनदंन केले व शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा. डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर मा. दौलतराव देसाई यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रघुवीर (भाई) मंत्री यांनी मनोगत व्यक्त करताना “कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचे असेल तर आतापासून कष्ट करा तरच आयुष्यात यशस्वी व्हाल” असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. तसेच त्यांनी शाळेला 51 हजार रुपयांची बहुमोल अशी देणगी दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. धनश्री तुळसकर, प्रास्ताविक सौ. सोनल जोशी, बक्षिसांचे वाचन कु. ममता वैद्य व आभार श्री. पांडुरंग मिशाळ यांनी केले.
या वेळी बॅ. बी. के. कॉलेजचे प्राध्यापक उपस्थितीत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी सहकार्य केले.










