वैभववाडीत उद्या भव्य शुटिंग बाॅल स्पर्धा : स्पर्धेची जय्यत तयारी सुरू 

महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामवंत संघ होणार सहभागी

ग्रामसेवा मंडळ उंबर्डे व वैभववाडी असोसिएशनचे आयोजन 

वैभववाडी l प्रतिनिधी :   येथील बाजारपेठेत भव्य राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धा सोमवार दि. ४ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नियोजनबद्ध पद्धतीने ही स्पर्धा संपन्न होणार आहे. ग्रामसेवा क्रिडा मंडळ उंबर्डे व वैभववाडी तालुका शुटिंग बाॅल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वी राष्ट्रीय शुटिंग बाॅल स्पर्धा संपन्न होत आहे. ही स्पर्धा वैभववाडी बाजारपेठ दत्त मंदिर नजीकच्या पटांगणावर दिवसरात्र होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय व चौथ्या क्रमांकाला ५ हजार रुपये व आकर्षक चषक तसेच इतर रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा व गोवा तसेच महाराष्ट्रातील मालेगाव, पुणे, सांगली व सातारा या ठिकाणचे नामवंत संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तरी या स्पर्धेत क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन ग्रामसेवा क्रिडा मंडळ अध्यक्ष एस.एम. बोबडे व वैभववाडी तालुका शुटिंग बाॅल असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप रावराणे यांनी केले आहे.