वेंगुर्ले l दाजी नाईक :उभादांडा येथील श्री. सागरेश्वर मंदिरच्या मागच्या बाजूला सुरूच्या बागेत आज दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुरूचे नुकसान झाले आहे, दरम्यान नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे आग वेळीच विजवल्याने मोठा अनर्थ टळला.
श्री. सागरेश्वर मंदिरामध्ये आज धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या मागील बाजूने सुरू मध्ये धूर येऊ लागला. त्यावेळी पाहिले असता सुरुच्या झाडांना आग लागल्याचे दिसून आले. मंदिरात असलेल्या श्रीकांत रानडे भटजींनी तात्काळ वेंगुर्ले नगरपरिषद आणि वेंगुर्ले पोलीस ठाणे येथे या आगीची माहिती दिली.
त्यानुसार तत्काळ वेंगुर्ले नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला आणि कर्मचाऱ्यांनी पाणी मारून आग विजवली. यावेळी मंदिराचे पुजारी विजू सांडये गुरुजी, प्रसाद जोशी व स्थानिक ग्रामस्थांनी ही आग विजवण्यासाठी प्रयत्न केले.











