चिपळूणमधील कामथे घाटातील घटना
चिपळूण (वार्ताहर ) दोनच दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमधील कामथे घाटात क्रेनचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी याच घाटात झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. ओंकार राजेश पाकळे (२७, चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार हा आपल्या ताब्यातील यामहा कंपनीची आरवन 5 ही दुचाकी घेऊन रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास कामथे घाटातून वेगाने चालला होता. मात्र, वांगी पुलाजवळ एका अवघड वळणावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि अत्यंत वेगात असणारी बाईक महामार्गवरील लोखंडी रेलिंगला धडकली. ही धडक एवढी जोरात होती की ओंकारच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यातून खूप रक्तस्राव झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला.
अपघात झालेला पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यातील काहींनी ओंकारला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सायंकाळी उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.












