माजगांवची सुकन्या चैताली कुटेमाटेची सहाय्यक सहकार अधिकारी पदावर नियुक्ती

 

स्पर्धा परीक्षेमधून खुल्या प्रवर्गातून मिळविले यश

सावंतवाडी । प्रतिनिधी : जिद्द परिश्रम व मेहनत घेण्याची तयारी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करीत यश नक्कीच प्राप्त करता येते हे आपल्या कर्तुत्वाने सिद्ध केलं आहे ते माजगांव येथील
भाईसाहेब सावंत हायस्कूलचे कर्मचारी कै. भरतराव व्यंकटराव कुटेमाटे यांची ज्येष्ठ कन्या कु.चैताली भरतराव कुटेमाटे हिने. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर खचून न जाता परिस्थितीवर मात करीत तिने अधिक परिश्रम व मेहनत घेत स्पर्धा परीक्षेत यश मिळवीले.

या यशानंतर तिची उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे सहाय्यक सहकार अधिकारी ह्या पदावर स्पर्धा परीक्षे मधून खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेवर नियुक्ती झाली आहे.कु. चैताली ही लहानपणा पासून मेहनती व होतकरू हुशार विद्यार्थीनी होती. तिने सावर्डे शिक्षण संस्थेतून बिएससी ( ॲग्री ) चे पदवी शिक्षण पुर्ण केले. शिक्षण होताच तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. दुर्दैर्वाने याच कालावधीत तिच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले. मात्र, वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता आपल्या आईची व बहिणी तसेच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा चैताली हिने जोमाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. सहकार विभागा मार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ती खुल्या प्रवर्गातून गुवात्तेवर सदर परीक्षा उत्तीर्ण झाली.

तिच्या या यशाचे संपूर्ण माजगाव व सावंतवाडी येथे कौतुक करण्यात येत आहे. जिद्द व चिकाटी असली की कोणत्याही परिस्थितीवर मात करता येते हे आपल्या कर्तुत्वातून तिने सिद्ध करून दिले असून स्पर्धा परीक्षार्थींना तिच्या या यशातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.