क्रिकेटचा निःसीम चाहता हरपला : मळगांव येथील किशोर नाईकचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : लहानपणापासूनच दोन्ही पायांना अपंगत्व आलेले असतानाही कुठेही क्रिकेटची मॅच असली तरीही ती पहाण्यासाठी कोणाची तरी सोबत घेत मैदानावर पोहोचणारा क्रिकेटचा निःसीम चाहता आज हरपला. मळगांव रस्तावाडी येथील युवक किशोर रामचंद्र नाईक (३६) याचे बुधवारी दुपारी २ च्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. एक उत्कृष्ट कॅरमपटू म्हणूनही त्याची ओळख होती. एका असाध्य आजाराशी त्याची झुंज अखेर अपयशी ठरली.

गेले काही दिवस गोवा बांबुळी रुग्णालयात त्याच्यावर चार सुरू होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्याला घरी आणण्यात आले होते. त्यातच राहत्या घरी दुपारी त्याची प्राणज्योत मालवली. किशोरला क्रिकेटचे अक्षरशः वेड होते. क्रिकेटची मॅच असली की तो टिव्ही समोर बसून असे. लहान असताना तो रेडिओवर कॉमेंट्री ऐकत बसे. केवळ एवढचं नव्हे तर गावातील तसेच दशक्रोशीत होणारे टेनिस बॉल क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी तो तिथे पोहोचायचा. सर्व क्रिकेट सामन्यांचा तो मनमुराद आनंद घ्यायचा. त्याचा भाऊ सचिन नाईक हा एसटी बस चालक असून तो मळगांव येथील प्रसिद्ध दत्तप्रसाद क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू. त्याचे सामनेही तो आवर्जून पाहायला यायचा. दोन्ही पायांनी अपंगत्व असले तरीही रिक्षा व कधीकधी दुचाकीवर देखील बसून तो मैदानावर पोहोचत असे. एक क्रिकेट वेडा व क्रिकेटचा निःसीम चाहता हरपला अशा शब्दांत त्याच्या प्रती सर्वांनीच सहवेदना व्यक्त केली.

किशोर हा उत्तम कॅरमपटू होता. कॅरम खेळण्यासाठी तो दूर दूर जात असे. कॅरम संघटनेच्या सदस्यांशीही त्याचा चांगला परिचय होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा. त्यामुळे तो सर्वांचाच लाडका होता. त्यामुळे त्याच्या आकस्मिक जाण्याने क्रिकेट सोबतच कॅरम क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होत आहे. किशोरच्या पश्चात आई, भाऊ सचिन, वहिनी, पुतण्या, पुतणी, विवाहीत बहीण, काका, काकी, चुतल भाऊ बहिणी असा मोठा परिवार आहे.