कुणकेरी हुडोत्सवाचा आज प्रारंभ : रविवारी सांगता

Google search engine
Google search engine

कोलगांव । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सवाला आज शनिवार ११ मार्च पासून प्रारंभ होत असून रविवारी १२ मार्चला या उत्सवाची सांगता होणार आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर त्यात उत्सवाचा मुख्य दिवस रविवार आल्यामुळे यावर्षी भाविकांची अलोट गर्दी होणार आहे.
यानिमित्त शनिवारी दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार असुन त्यांनतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहे. तसेच घुमटवादनासह हुडा आणि होळीवर धुळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकुन ढोल ताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेउन हुडा आणि होळी भवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

हुडोत्सवाचा मुख्य दिवस रविवार असून या दिवशी सकाळ पासून भावई देवीच्या घरात देवीची ओटी भरणे नवस फेडणे आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार असून याचवेळी पळसदळा येथे आंबेगाव श्री देव क्षेत्रपाल निशाण भेट त्यानंतर कोलगाव सिमेवर कलेश्वर निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिरकडे येणार आहे. सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडेमोडणी व लूटूपुटूचा खेळ होणार असून सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा व श्री दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.