सिंधुरत्न समितीचे सदस्य व उद्योजक किरण सामंत यांना निवेदन
राजापूर l प्रतिनिधी : राजापूर शहराला भेडसावणाऱया पूराच्या समस्येवर मात करण्यासाठी गतवर्षी नाम फाउंडेशन सहकार्याने राजापूर नगर परिषद व महसुल प्रशासनाने लोकसहभागातून राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा केला असला तरी अद्यापही या नदीपात्रात मोठ्या पमाणात गाळ शिल्लक असून हा गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सिंधुरत्न समितीचे सदस्य व उद्योजक किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नाम फाऊंडेशनसह नगर पालिकेचा पुढाकार आणि लोकसहभागातून राजापूर शहरातील वर्षानुवर्षेच्या पूरस्थितीला कारणीभूत ठरणारा अर्जुना-कोदवली नदीपात्रातील गाळाचा उपसा करण्यात आला. या कामासाठी लोकवर्गणीतून उभारलेल लाखो रूपयांचा निधी, जिल्हा नियोजनमधून उपलब्ध झालेला निधी याचेही सहकार्य लाभले. गतवर्षी गाळ उपसा झाला असला तरी, अद्यापही अर्जुना नदीवरील मोठा पूल ते कोंढेतड पूल या दरम्यान अर्जुना नदीपात्रामध्ये सुमारे 1.55 लक्ष घनमीटर गाळ उपसा अद्यापही शिल्लक राहीलेला आहे. शहरातील भविष्यातील पूरस्थितीची तीव्रता अधिक कमी होण्यासह पूराचे गडद संकट दूर होण्यासाठी या गाळ उपशाची प्रतिक्षा राहीली आहे.
दरम्यान, मोठा पूल ते कोंढेतड पूल या दरम्यानचा अर्जुना नदीपात्रामध्ये शिल्लक असलेला सुमारे 1.55 लक्ष घनमीटर गाळाचा उपसा करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होण्यासह गाळ उपशाचे यांत्रिक विभागाला आदेश व्हावेत अशी मागणी येथील नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर गुरूवारी राजापूरात आलेल्या किरण सामंत यांची शहरातील नागरीकांनी भेट घेत गाळ उपशासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.
यावेळी सामंत यांनी गाळ उपशासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पयत्न करण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, सौरभ खडपे, अरविंद लांजेकर, महेश शिवलकर यांच्यासह शिवसेनेचे अशफाक हाजू, दिपक नागले आदी उपस्थित होते.







