पण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी येणार कधी ? सर्वसामान्यांचा प्रश्न
दापोली | रुपेश वाईकर :- राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे शनिवारी दापोली दौऱ्यावर असुन विविध ठिकाणची 400 कोटींच्या विकासकामांची भुमिपुजने करणार आहेत. यामध्ये दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात 100 खाटांचे नवीन रुग्णालय ज्यामध्ये अतिदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील त्यासाठी 20 कोटी 21 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत याचे देखील भुमिपुजन करणार आहेत. परंतु नुसते भुमिपुजन करुन नवीन वास्तु उभी करुन जर का एकही तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि एम.बी.बी.एस डॉक्टर्स नसतील तर ही वास्तु फक्त शोभेची बाहुली बनुन राहील असे येथील सर्वसामान्य गरीब जनतेचे मत आहे. या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स यावेत याकरीता दापोली तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दोन वेळा उपोषण करण्यात आले होते. परंतु त्यावेळी अधिकचे हाती लागले नाही. यामध्ये सर्वसामान्य गरीब जनतेचे हाल मात्र होत आहेत. राजकीय पुढारी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर दापोली तालुका आला आहे. या तालुक्यात पर्यटकांची संख्या कमालीची आहे. परंतु तालुक्यात एखादी वाईट घटना घडल्यास त्याची जबाबदारी घेण्यासाठी एकही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने शहरी व ग्रामीण रुग्णांचे हाल संपता संपेनात.
केंद्र शासन व राज्य शासनाने 15 आँगस्ट 2023 ला 75 व्या अमृत महोत्सव निमित्ताने सर्व शासकीय रुग्णालयात उपचार पुर्णपणे मोफत होतील असे जाहिर केले. परंतु दापोली उपजिल्हा रुग्णालयात एकही कायमस्वरूपी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने ही योजनेचा लाभ घेणार कोण असा प्रश्न उपस्थित राहतो आहे.
दापोली येथील उपजिल्हा रुग्णालय हे गेले अनेक वर्ष व्हेंटिलेटरवर आहे. 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात एकही तज्ञ वैद्यकीय अधिकारी अथवा एकही एमबीबीएस दर्जाचा वैद्यकीय अधिकारी नाही. याठिकाणी सर्वच कंत्राटी बी.ए.एम.एस. व आयुष वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची हालत होत असून महिलांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच गंभीर रुग्णांना उपचारासाठी तज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने खासगी रुग्णालय किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला जातो. जिल्हा रुग्णालय हे दापोली पासुन 160 कि.मी. आहे. यावेळी त्या रुग्णांचे होणारे हाल याची कल्पनाच केलेली बरी. दापोली येथील उपजिल्हा रग्णालयात वैद्यकिय अधीक्षक वर्ग 1 चे 1 पद मंजूर असून ते रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग 7 पदे असुन मंजूर असली तरी तीही पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी (सर्जन), वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ), वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण), वैद्यकीय अधिकारी (भिषक), वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) यांचे प्रत्येकी 1 पद मंजूर असूनही ही सर्व पदे रिक्त आहेत. सुश्रूषा विभागातील सहाय्यक अधिसेविका वर्ग 3 चे 1 पद मंजूर असून ते रिक्त आहे. अधिपरिचारिका वर्ग 3ची 12 पदे मंजूर असून त्यातील 8 पदे कायमस्करपी भरलेली असून, 4 पदांवर अस्थायी कर्मचारी कार्यरत आहेत. क्ष-किरण तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध-निर्माण अधिकारी, नेत्रचिकित्सा अधिकारी या पदावर कर्मचारी कार्यरत असून लिपिक संवर्गातील सहाय्यक अधीक्षक 1 पद, वरिष्ठ लिपिक 1पद मंजूर असून ही पदे रिक्त आहेत. अन्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त आहेत.











