खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील असगणी रस्ता अर्धवट स्थितीत असतानाच आता येथीलच लवेल ऐनवरे रस्त्याबाबत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कामाचे भूमिपूजन होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. येत्या आठ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती लवेलचे उपसरपंच शेखर शिंदे यांनी दिली.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १७ डिसेंबर २०२३ रोजी या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. चिपळूण येथील एस. एम. चिपळूणकर ठेकेदाराने या रस्त्याची खोदाई करून काम वेळेत पूर्ण करणार असल्याची
ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात चार महिने लोटले तरी अद्याप त्यावर साधी खडी पडलेली नाही. अजूनही अनेक ठिकाणच्या गटारांचे काम शिल्लक आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, रुग्ण व प्रवासी यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर रस्त्यालगत असणाऱ्या घरांमधून धुळीचा थर जमा होत आहे. काम पूर्ण न झाल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. येत्या आठ दिवसात थांबलेले काम सुरू न झाल्यास सर्व ग्रामस्थांसह ग्रामपंचायत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.










