लोटे परिसरातील सर्व्हिस रोडमुळे वाहतुकीची कोंडी

 

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे, घाणेखुंट, पीरलोटे व अन्य बाजारपेठेच्या ठिकाणाजवळून ठेवण्यात आलेले सर्व्हिस रोड अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे.

मुंबई – गोवा चौपदरीकरणात खेड व चिपळूण

मार्गावर असणाऱ्या बाजारपेठा महामार्गाच्या खालील भागात ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत वा दुतर्फा गावात जाण्यासाठी महामार्गालगत सर्व्हिस रोड ठेवण्यात आले आहेत. मात्र, ते अतिशय अरुंद असल्याने दोन वाहने समोरासमोर आल्यास त्यांना एकमेकांना बाजू देण्यात कसरत करावी लागत आहे. परिणामी वाहतूककोंडी होत असते.

 

सकाळी कामावर येणाऱ्या किंवा कामावरून जाणाऱ्या कामगारांची, शाळेत, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका वा तत्सम वाहनांची कुचंबणा होते. लोटे, घाणेखुंट, पीरलोटे येथे त्या-त्या ग्रामपंचायतींनी सर्व्हिस रोडवर बसथांब्यांची मागणी केली आहे. मात्र, अनेकदा या वाहतूक कोंडीचा सामना टाळण्यासाठी दोन्ही आगारांतील बसेस सर्व्हिस रोडवरून न जाता मुख्य महामार्गावरून जातात. त्यामुळे प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नियोजनाअभावी केलेल्या कामाबद्दल वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.