नातूवाडी धरणामुळे खेड मध्ये दुबार शेती देतेय आधार

खेड (प्रतिनिधी) कोकणात बहुतांश ठिकाणी पावसावर आधारीत भातशेती प्राधान्याने केली जाते. मात्र त्याला अपवाद खेड येथील नातूनगर धरणाच्या सिंचन क्षेत्रातील गावे ठरत आहेत. या धरणाचे पाणी शेतीसाठी उन्हाळ्यातही उपलब्ध होत असल्याने भूईमूग व भात लागवड उन्हाळ्यात देखील केली जात आहे. दुबार पिक मिळत असल्याने येथील काही शेतकरी आता व्यावसायिक शेतीकडे वळत आहेत. किंबहुना ही शेती आधार ठरत आहे

नातूवाडी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले गेल्यास व शासनाने त्यासाठी कृषी विभागा मार्फत पुढाकार घेतल्यास अधिक लागवडी खाली क्षेत्र आणता येईल अशी परिस्थिती आहे. सद्यस्थितीत १५० हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आले आहे.

कोकणातील शेती ही प्रामुख्याने दोन पद्धतीत केली जाते. त्यामध्ये बागायती मध्ये आंबा, काजू, नारळ, पोफळी यांची लागवड केली जाते तर तृणधान्या मध्ये भात, नाचणी, वरी तर कडधान्या मध्ये चवळी, मूग, उडीद,पावटा, तुर, भूईमूग आदींचा समावेश होतो. कोकणातील शेती ही मोसमी पावसावर केली जाते. असे चित्र आहे. परंतु कोकणातील दऱया खोऱ्यामध्ये जी धरणे पूर्ण झाली आहेत. त्या धरणातील पाण्याचा योग्य प्रकारे सिंचनासाठी वापर झाल्यास येथील शेतजमिनीत दुबार पिक घेता येऊ शकते. हे खेड तालुक्यातील नातूवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रात दिसून येत आहे. या धरणाचे दोन प्रमुख कालवे असुन, दोन्हीही कालव्या मधून शेतीसाठी व बागायती साठी पाणी सोडले जाते.

कोकणात चार महिने मुसळधार पाऊस पडत असल्याने साधारण डिसेंबर नंतर धरणाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा लागतो. नातूवाडी धरणाच्या सिंचन क्षेत्रात २० हून अधिक गावे असुन, २ हजार ५० हेक्टर क्षेत्र जलसिंचन करण्याची या धरणाची क्षमता आहे. धरणाच्या पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत शेतकरी गट स्थापन करून पाणी वापर समित्याची निर्मिती नातूवाडी धरणाच्या डावा व उचवा कालवा परिसरात येणाऱ्या गावांमध्ये करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत नातूवाडी, बोरघर, खवटी, उधळे, वावे, आपेडे, कळंबणी, भरणे, भडगाव, खोंडे, चाकाळे, मुरडे, आंबये, जामगे, शिवतर या गावांच्या परिसरामध्ये १५० हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आहे. बागायती क्षेत्र वगळता काही गावातील शेतकरी आता दुबार भातशेती, कडधान्य शेती घेत असुन, काही शेतकऱ्यांनी भातशेतीला पर्याय म्हणून भूईमुगाची देखील लागवड केलेली दिसून येत आहे. योग्य मार्गदर्शनामुळे परिसरातील आणखी लागवडी योग्य जमिन लागवडी खाली येऊ शकते. त्या दृष्टीने शासनाने जनजागृती आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास अल्प भु – धारक असताना देखील समाधानकारक शेती उद्योग व कृषी पर्यटन क्षेत्र तो उभा करू शकतो याची अनेक उदाहरणे सद्यस्थितीत समोर येत आहेत. त्यातच नातूवाडी धरण क्षेत्रातील दुबार शेतीला प्रोत्साहन व व्यावसायिकतेचे मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच त्याचा परिणाम कोकणाच्या अर्थ व्यवस्थेवर दीर्घ कालीन दिसून येईल असा विश्वास शेतकरी व्यक्त करीत आहेत.