खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी कोकण मार्गावर धावत असलेल्या दोन होळी स्पेशल गाड्या पहिल्याच दिवशी विलंबाने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली, या पाठोपाठच अन्य तीन रेलगाडाही उशिराने मार्गस्थ झाल्याने विलंबाच्या प्रवासाची विघ्न कायम राहिले आहे.
शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाल्याने चाकरमान्यांची गावी येण्याची लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेने आतापर्यंत १० होळी स्पेशल जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला आहे. शिमगोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेत आणखी होळी स्पेशल चालवण्याची मागणीही करण्यात येत आहे. याशिवाय रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी आतापासूनच एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा सुरू केला आहे.
०११४० क्रमांकाची थिविम- पनवेल होळी स्पेशल १ तास ३५ मिनिटे तर ०११४८ क्रमांकाची थिविम-पनवेल होळी स्पेशल २ तास उशिराने रवाना झाली. या दोन्ही होळी स्पेशल विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. २२६५६ क्रमांकाची निजामुद्दीन- एर्नाकुलम साप्ताहिक स्पेशल ५ तास २५ मिनिटे तर १२९७८ क्रमांकाची मरूसागर एक्सप्रेस १ तास ५० मिनिटे उशिराने मार्गस्थ – झाली. या पाठोपाठच १११०० मडगाव-एलटीटी
स्पेशलसह १२६१८ क्रमांकाची निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस १ तास विलंबाने धावली.










