जगबुडी ब्रिजवर कंटेनर चालक बेशुद्ध, सामाजिक कार्यकर्त्यांमुळे जीव वाचला

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज, शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी १२:४५ वाजता एका गॅस कंटेनरचा चालक अचानक बेशुद्ध पडला. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचा जीव वाचला.
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथून खोपोलीकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक GJ 06 VB 2564 चा चालक गाडी चालवत असतानाच बेशुद्ध झाला. चालकाची ही गंभीर अवस्था पाहून सामाजिक कार्यकर्ते सतीश उर्फ बाबा चव्हाण यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी जगबुडी पुलाखाली कार्यरत असणाऱ्या श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान, नानिजधाम यांच्या २४ तास मोफत रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच रुग्णवाहिकेचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बेशुद्ध पडलेल्या चालकाला प्राथमिक उपचार दिले आणि पुढील उपचारासाठी त्याला भरणे येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. चालकाचे नाव दीपक कुमार सिंग (वय ३२, रा. झारखंड) असे असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वेळीच मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगण्यात येत आहे.