शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश : कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी एसटी सुविधा
उद्या प्रयोगाचा अंतिम दिवस : सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, प्रशासनाचे आवाहन
वैभववाडी | नरेंद्र कोलते : ‘जाणता राजा’ या महानाट्य प्रयोगाच्या दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या ठिकाणी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. जाणता राजा महानाट्य पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक व इतिहास प्रेमींनी पहील्या व दुसऱ्या दिवशीही मोठी गर्दी केली. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी नाटक पाहण्यासाठी गर्दी केली होती. २० रोजी या महानाट्याचा अखेरचा दिवस आहे. रसिक प्रेक्षकांनी सुवर्णसंधीचा आवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध करण्यात आले आहे. या महानाट्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून पूर्णतः मोफत आहे. दि. २० मार्च रोजी देखील जाणता राजा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
वैभववाडी तालुक्यात पहिल्यांदाच जाणता राजा महानाट्य सादर होत आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांना विनामूल्य (मोफत) हे महानाटक पाहण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे. नाधवडे महादेव मंदिर नजीकच्या भव्य पटांगणावर हे महानाट्य संपन्न होत आहे.
जाणता राजा या नाटकामध्ये जवळपास १५० कलाकार सहभागी झाले आहेत. घोडे, उंट यांचा देखील या नाटकात समावेश आहे.
प्रशासनाकडून नाटक स्थळी वेळेत पोहचण्यासाठी एस. टी. सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कणकवली, देवगड तसेच अन्य तालुक्यातून एसटी सेवा देण्यात आल्या आहेत .वैभववाडी तालुक्यातील अनेक गावांतून बुधवारी देखील एसटी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे महानाट्य आयोजित करण्यात आले आहे. २० मार्च रोजी देखील या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












