स्वप्नांचा पाठलाग करा! उद्योजक संजय गावडे

मसूरे डांगमोडे शाळेत “मी कसा घडलो” उपक्रम

मसुरे | झुंजार पेडणेकर :व्यवसाय करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत यांची नितांत आवश्यकता असते. स्वप्नांचा पाठलाग करण्यास शिका. ध्येय निश्चित केल्या नंतर ते पूर्ण हिण्यासाठी खूप मेहनत घ्या. “एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो ” तसा पत्नी सौ. सुवासिनी गावडे यांचा हात माझ्या यशा मागे आहे असे प्रतिपादन उद्योजक संजय गावडे यांनी मसुरे डांगमोडे येथे केले.

” मी कसा घडलो” या विषयावर मालवण येथील अतिथी बांबू हॉटेलचे मालक संजय लक्ष्‍मण गावडे यांनी मसूरे डांगमोडे शाळेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन मिळावे हा हेतू समोर ठेवून श्री. बाळप्रकाश ठाकूर व शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक डोंगळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोक डोंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी माजी प स सदस्या सौ.गायत्री ठाकूर, ग्रा सदस्या सौ. पूजा ठाकूर, समाजसेवक श्री.बाळप्रकाश ठाकूर, श्री.प्रकाश ठाकूर, श्री.सुरेंद्र ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष महेश ठाकूर, नवदुर्गा तरुण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, किशोर ठाकूर, स्वप्नील ठाकूर व गावातील इतर तरुण मंडळी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक श्री प्रकाश ठाकूर यांनी केले. प्रस्ताविकेतून त्यांनी व्यवसाय मार्गदर्शनाची गरज स्पष्ट केली. तसेच बाळप्रकाश ठाकूर यांनी प्रमुख वक्त्यांची ओळख करून देताना त्यांच्या बालपणीचा मागोवा घेतला. शून्यातून विश्व निर्माण करणारा अवलिया यांचे बालपणीचे किसे ऐकताना ग्रामस्थांचे डोळे पाणावले.

उद्योजक श्री.संजय लक्ष्‍मण गावडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून “मी कसा घडलो” यावर प्रकाश टाकला. व्यवसायाची सुरुवात कशी केली याचे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी ग्रामस्थांना दिले. त्यानंतर मसुरे डांगमोडे शाळेतील विद्यार्थ्यांनी श्री.संजय लक्ष्‍मण गावडे यांची प्रश्नोत्तरे स्वरूपात मुलाखत घेतली. व्यवसायासंबंधी पडणारे वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची श्री संजय गावडे यांनी उत्तरे दिली व आपल्या बालपणीचे किस्से विदयार्थ्यांना ऐकवले. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याविषयी मार्गदर्शन केले. विहा ठाकूर, रुद्र ठाकूर, वैष्णवी ठाकूर, अक्षता ठाकूर, सिद्धेश ठाकूर, प्रथम ठाकूर व श्रेया खिलारे यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. श्री. संजय गावडे यांनी मुलांचे कौतुक करून त्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप केले.मुख्याध्यापक अशोक डोंगळे यांनी आभार मानले.