महामार्गावर फलकांअभावी वाहनचालकांची फसगत!

रखडलेल्या चौपदरीकरणाचा परिणाम; दिशादर्शक फलकांचा अभाव
 खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. चाकरमान्यांची आतापासूनच गावी येण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण अन् रस्त्याच्या दैनावस्थेमुळे जीवघेणा प्रवास कायम आहे. त्यात महामार्गावर दिशादर्शक फलकांअभावी गावी येणाऱ्या वाहनचालकांची फसगत होत आहे. या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी जनविकास आक्रोश समिती पुढे सरसावली असून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर सावध अन् काळजीपूर्वक वाहने हाकण्याचे आवाहन करत आहेत.
शिमगोत्सवासाठी गावी येण्याची ओढ सर्वच चाकरमान्यांना लागते. यंदाही लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावच्या देवीला साकडं घालण्यासाठी गावी डेरेदाखल होणार आहेत. यामुळे महामार्गावर वाहनांची बेसुमार संख्या वाढणार आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण करण्याच्या डेडलाईन आजवर हुकल्या आहेत. मात्र सणांच्या तोंडावर मंत्र्यांसह राष्ट्रीय महामार्ग खाते खडबडून जागे होतील. अन् मार्ग सुस्थितीत आणण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग खात्याला देण्यात येतील. या आदेशाची अंमलबजावणी करताना केवळ मलमपट्टी करण्यापलिकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून काहीच केले जात नसल्याने जनजागृतीसाठी केले जात नसल्याने जनआक्रोश समिती सरसावली.
वाहनचालकांची विशेषतः चाकरमान्यांची डोकेदुखी आजमितीस कायम राहिली आहे. महामार्गाचे चौपदरीकरण ठिकठिकाणी ऐनकेन कारणाने रखडले असून याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. महामार्गावर वाहतुकीच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली असतानाही वाहतुकीच्या समस्याही वाहनचालकांना सतावत आहेत. मुंबई – गोवा महामार्ग अजूनही निर्माणाधीनच आहे. अजूनही हव्या त्या सुविधांचा अभाव असून जागोजागी वाहतूकसंबंधी नियम दिलेले फलक, दिशादर्शक अनू दिशापरिवर्तन फलकांचाही थांगपताच नाही. याचमुळे वाहनचालकांची फसगत होत असून विशेषतः रात्रीच्या सुमारास वाहनचालकांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील वळण कोणत्या दिशेला आहे. हे समजण्यासाठी प्रयास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम योग्यप्रकारे अंमलात आणून महामार्गावर घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी जनविकास आक्रोश समितीने पुढाकार घेत रस्ते सुरक्षा अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानांतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्यास घोषवाक्य फलकांदारे जागृती केली जाणार आहे.
शिमगोत्सवात वाहनांच्या बेसुमार संख्येमुळे चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याशिवाय महामार्गावर घडणाऱ्या दुर्घटनांमुळे देखील विलंबाचा प्रवास करण्याची नामुष्की ओढवते. वाहतूक पोलिसाची देखील तितकीच दमछाक होते. या दुर्घटना टाळण्यासह वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळवण्यासाठी अभियानास सर्वांनीच सहकार्य करावे. तसेच गावी जाताना किमान एक फलक आपल्या गावातील महामार्गावर लावून जनजागृतीस सहयोग द्यावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.