९ हजारांचे साहित्य ही चोरले
खेड(प्रतिनिधी) कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे मुळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके गावातील मालमत्तेचा सरकारी लिलावा झाला होता. ही मालमत्ता खरेदी केलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत होम हवन केलं होतं. हे विधी करताना वापरण्यात आलेल्या वस्तूंची अज्ञाताने चोरी केल्याप्रकरणी तसेच धमक्या दिल्या जात असल्या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुजा साहित्याची चोरी
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याची खेड मधील मुंबके या मूळ गावातील मालमत्ता दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी साफेमा अंतर्गत झालेल्या लिलावात खरेदी केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२४ रोजी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचे भारद्वाज यांच्या नावे हस्तांतरित झाले. त्यानंतर त्याच दिवशी मुंबके येथे जाऊन वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी सनातन धर्मानुसार होम हवन करायला सुरुवात केली. त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे त्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी त्या ठिकाणी सकाळी भारद्वाज गेले असता त्या ठिकाणी ठेवलेले धार्मिक पुस्तके पूजेचे साहित्य तसेच घरगुती वस्तू व सांस्कृतिक मालमत्ता चोरीला जाऊन अस्तव्यस्त टाकून देण्यात आलेल्या दिसून आल्या . त्यामध्ये समई हवन कुंड स्टीलचे ताटे अशाप्रकारे ९ हजार ४०० रुपये किमतीच्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी खेड पोलीस ठाण्यात दिली आहे. २६ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात भा.द.वी. कलम ३७९, ४५१, ,४२७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम कासकर यांची भारत सरकारने साफेमा अंतर्गत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव केला होता, दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी दाऊदच्या मुंबके या मूळ गावातली मालमत्ता घेतली. दोन महिन्यापूर्वी ही मालमत्ता त्यांच्या नावावर हस्तांतरित देखील झाली. २०२० ते २०२४ यादरम्यान वेळोवेळी ही प्रक्रिया चालू असताना मुंबके या गावात माझं येणं जाणं असलं तरी स्थानिक लोकांकडून मला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रारीत भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस करत आहे.









