खेड (प्रतिनिधी) – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे राष्ट्रीय युवा दिन आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त १२ जानेवारी २०२६ रोजी भव्य ३ कि.मी. मॅरेथॉनचे उत्साहात आयोजन करण्यात आले. एन.एस.एस. विभागामार्फत आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. परिसरात पहाटेपासूनच तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी एन.एस.एस. प्रोग्राम ऑफिसर प्रा. व्ही. डी. कांबळे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी भाषण करत युवकांना आत्मविश्वास, शिस्त आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन केले. त्यांनी युवक हे देशाचे भविष्य असल्याने तंदुरुस्ती आणि मानसिक बळाची गरज आजच्या काळात अधिक असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर श्री. एस. जी. बोले यांनी उत्तम आरोग्याचे जीवनातील महत्त्व विशद करत, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारण्याचा संदेश दिला.
या उपक्रमासाठी प्रा. पी. एल. वरक यांनी समन्वयकाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली, तर एन.एस.एस. स्वयंसेवक रोहन कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली. सर्व स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागामुळे मॅरेथॉन अतिशय सुरळीत पार पडली. घरडा इन्स्टिट्यूटच्या परिसरात पार पडलेल्या या मॅरेथॉनमुळे युवकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याची प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक, शिक्षकवर्ग आणि स्वयंसेवकांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
या उपक्रमास प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील आणि रजिस्ट्रार प्रा. संदीप मुनघाटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी आणि एनएसएस स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरुणाईच्या जोशाने आणि उत्साहाने गाजलेल्या या मॅरेथॉनने राष्ट्रीय युवा दिनाची शोभा अधिक वाढवली.












