काजूपिक अत्यल्प
अशा दुहेरी संकटात शेतकरी
काजूपिकास हमी भाव मिळावा शेतक-याची मागणी
शिरगाव ( प्रतिनिधी) निसर्गाच्या लहरी वातावरण व अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी काजू पिकास किड रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे.यामुळे काजूपिक अत्यल्प आले आहे.त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्याच बरोबर शेतकऱ्याचा मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
शेतक-यांचे काजू पीक हे नगदी उत्पन्न देणारे साधन आहे.तसेच आंबा व काजू या दोन पिकांवर त्याचे अर्थकारण अवलंबून आहे.
यावर्षी वातावरणातील बदल , लहरी निसर्ग व अवकाळी पाऊस या सर्वांचा परिणाम काजू व आंबा पिकाच्या फलधारणेवर झालेला दिसून येत आहे.यावर्षी १५-२० टक्केच पिक आहे. त्यातच काजू पिकावर किड रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने काजू बी च्या मध्यभागी डोळ्याजवळ किडीने शिरकाव केला आहे. त्यामुळे हि काजू बी काळी पडत आहे. अशा काजू बी विक्रेते घेत नाहीत. तसेच यावर्षी काजूपिकाचे उत्पादनही खुपच कमी आहे. तरीही काजू बी ला हमी भाव नसल्यामुळे शेतकरीवर्गात मोठी नाराजी पसरली आहे.
काजू बागेची साफसफाई,काजूच्या झाडांना खते, फवारणीसाठी महागडी औषधे, कामगारांची मजूरी यासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च येतो.त्यातच काजूचे उत्पादन अत्यल्प असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
तसेच काजूबोंडूवर प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतक-यांना बोंडू फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.त्यामुळे शेतक-यांना बोंडू विक्रीतून आर्थिक मदत मिळण्याची आशा नाही.या समस्यांकडे व्यावसायिक दृष्टिने लक्ष देण्यासाठी नवीन उदोजक पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतक-याना काजू बोंडूपासून थोडीफार आर्थिक मदत होईल. असे वाटते.
तरी या शेतकऱ्यांच्या काजूपिकास हमी भाव देण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गात होत आहे










