सावधान, कोकणात पाणी टंचाईचे संकट…!

जगामध्ये दोन महायुद्ध झाली. यानंतरच होणारं तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल असं अनेक जलतज्ञ व्यक्त करताना दिसतात. पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल की होणार नाही हे येणारा काळ ठरवेल. परंतु पाण्यासारखा विषय आपण सर्वांनीच फारच गांभिर्याने घेतला पाहिजे. परंतु आपण कोकणवासिय तसं म्हटलं तर कोणताच विषय फार गांभिर्याने घेत नाही. याच कारण आपणाला फार कधी काही सोसावं लागत नाही. लागलं नाही. त्यामुळे जे आहे त्यात समाधान फार काही दगदग न करता जे काही मिळतय ते पुरेस म्हणत गप्प रहाणं पसंद करतो. दुष्काळ कसा असतो त्याच्या झळा कशा असतात याची आपणाला कोणतीच माहिती नाही. महाराष्ट्रातील काही भागात विशेषत: ग्रामीण महाराष्ट्रात आजही दुष्काळात होरपळणारी लोक आहेत. पाण्यासाठी कशी वणवण करावी लागते आणि दोन-सहा घागर पाणी आणून पायपीट करणारी शेतकरी जेव्हा आपण पहातो तेव्हा आपल्या डोळयात पाणी आल्याशिवाय रहात नाही. या अशा परिस्थितीमुळे पाण्याच महत्व महाराष्ट्रातील अनेक भागातून अधोरेखित झाले आहे. आपल्या कोकणात दिडशे इंच पाऊस पडतो. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अगदी नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडतो. मागील तीन वर्षात पाऊस बाराही महिने पडणार की काय असं वाटण्यासारखी स्थिती आहे. यातच पाण्याची टंचाई जाणवणार असं वाटत असतानाच कोकणात पाऊस कोसळायला सुरूवात होते. सुदैवाने यामुळे पिण्याच्या पाण्याच येणार संकट टळत. परंतु यावेळी देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील बेंगलोर शहरात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. आजच्या क्षणाला बेंगलोर शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई आपल्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. पाणीसाठे कमी होत आहेत. बोअरिंग खोदून पाणी खेचण्याचे काम सुरू आहे. परंतु पाणी अडवण्याचे पाणी साठवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. पूर्वी कोकणातील गावो-गावी शेताला लागून असणाऱ्या ओहोळावर कच्चे बंधारे बांधले जायचे. गावातील प्रत्येक वाडी-वस्तीतून वाहणाऱ्या ओहोळावर हे कच्चे बंधारे ग्रामस्थ श्रमदानाने बांधत असत. अलिकडे हे प्रमाण फारच कमी झाले आहे. शासकीयस्तरावर कच्चे बंधारे बांधण्याचे फोटोसेशन सुरू झाल्यानंतर प्रशासनातील कर्मचारी संघटना फोटोसाठी बंधारा बांधतात. परंतु ग्रामस्थ एकत्र येऊन जे श्रमदान व्हायचे आणि वस्तीत पाणी साठवल जायच त्यामुळे सहाजिकच पाणी अडवल जाण्याचे विहीर आटण्याचे प्रमाण कमी होते. परंतु कोकणातील मध्यम आणि लघु धरणांची कामही पूर्ण झाली पाहिजेत. आज पाण्याच्या टंचाईकडे जर आपण आपणाकडे काही फरक पडणार नाही अशी समजूत करून जर पहाणार असलो तर ते पूर्णपणे चूकीच ठरणार आहे. पाण्याच्या विषयात आपण सर्वांनी गांभिर्याने घेतलं पाहिजे. पाण्याचे जे सोर्स आहेत ते जपले पाहिजेत. शहरातून जाणाऱ्या नदी किनारी बांधकामांना परवानगी दिली जाता कामा नये. मुंबईत जसा समुद्रात बांधकाम उभी रहात आहेत तसच कोकणातही वहात्या नद्यांमध्ये माती टाकून त्याठिकाणी मोठ्या इमारती उभ्या रहात आहेत. समाजहिताचा विचार करून तत्काळ थांबवल पाहिजे. कोकणातील नदी, नाले, डोंगर हे सर्व आपण जपलच पाहिजे. कोकणाच कोकणपण हे डोंगर-दऱ्या, नदी-नाले, ओहोळ यामध्येच आहे. आणि हेच जर आपण नष्ट करणार असलो तर ते आपला करंटेपणा ठरेल. पाणी टंचाईची कारण ही सगळी यामध्येच आहेत. आपल्याकडच्या विहीरी कोरड्या पडत आहेत. बोअरिंगच पाणीही कमी होत आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. यासाठी कोकणवासियांनी वेळीच सावध राहिलं पाहिजे. राजकारण आपल्या पद्धतीने आणि दिशेने होत राहिलं. परंतु जर आपण जीवनाशी निगडित आणि महत्वपूर्ण असणाऱ्या पाणी या विषयाकडे दुर्लक्ष करत असलो तर काळ आपणाला माफ करणार नाही. कवठेमहाकाळचे त्यावेळचे आमदार अजितराव घोरपडे (सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना असेच कणकवलीच्या गेस्ट हाऊसला पत्रकार परिषदेनिमित्त त्यांची भेट झालेली. जून महिना होता. जोरदार पाऊस सुरू झालेला. बाहेरील पाऊस पाहून आम्ही सहज म्हणून हा आता कधी थांबणार असं म्हटलं यावर घोरपडे सरकार म्हणाले, नाही ओ असं म्हणू नका माझ्या भागात लोक पावसाची वाट बघत असतात. माझा दुष्काळी भाग एकदा बघा तरी. मी कवठेमहाकाळ, आटपाटी या भागात फिरून आलो. जुलै महिन्यात आकाशात, एखादा ढग जरी काळोख करताना दिसला तरीही शेतकरी पाऊस येईल म्हणून आशेवर असलेला दिसला. त्या भागात पाण्याच प्रचंड दुर्मिक्ष होते. त्यावेळीच ताकारी धरणातून पाणी वळवण्याच काम हाती घेतलं होतं. यामुळे दुष्काळ काय असतो हे पाहिल्यावर आपल्याला अस्वस्थ व्हायला होईल. आपण फक्त सावधानता बाळगली तरीही आपलं निसर्गाने दिलेलं वैभव, सृष्टीच सौंदर्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करीत पाण्याची टंचाईच भासणार नाही. एवढं तरी आपण करू शकू ना !